पुणे, दि. २३ – सर्व घटकांना सोबत घेत समाजाप्रती असलेली बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून दिसावी व त्यासाठी नि:स्वार्थ भावना असायला हवी, असे प्रतिपादन निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले यांनी आज येथे केले. थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक आणि विविध संस्थांचे आधारस्तंभ असलेल्या अनिल गानू यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, श्रीमती अश्विनी गानू व संपादक भालचंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत “अनिलपर्व” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी गोखले पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष आचरणातून समाजकार्याची ओढ सतत जागृत ठेवायला हवी. प्रसिद्धीपेक्षा कामावर भर देणाऱ्यांना समाज लक्षात ठेवतो. त्यापैकीच एक अनिल गानू होते. ज्यांनी कोकणात भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारला, पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत बाजीराव पेशवे पुतळा उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले. चित्पावन संघ, हर घर सावरकर, असीम फाऊंडेशन, आनंदघर वृद्धाश्रम, पुणे सार्वजनिक सभा, श्री सद्गुरू ग्रुप, आम्ही सारे ब्राह्मण अशा विविध सामाजिक संस्थांच्या पाठीशी अनिल गानू खंबीरपणे उभे राहायचे.
यावेळी सूर्यकांत पाठक, अजित गानू, विद्याधर नारगोलकर आणि स्वामी रामनारायण यांनी अनिल गानूंच्या कार्याला उजाळा दिला. राजेंद्र मनोहर, पौर्णिमा मनोहर आणि अपर्णा केतकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर अतुल केतकर यांनी आभार मानले. भालचंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
——-


