पुणे -पुणे शहरातील खड्डे नुसतेच डांबर टाकून बुजवु नका,त्याची पुनर्बांधणी करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून फिरायला लावून दुर्दशा झालेल्या रस्त्यांची पाहणी अहवाल सादर करुन पुनर्बांधणीचा आराखडा तयार करा अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षांना “खड्डे बुजवा नाहीतर रस्त्यावर उतरू” असे म्हणावे लागते ही शोकांतिका असून हे पुण्यासारख्या शहराला भूषणावह नाही.
“पुणे गेले खड्ड्यात” ही वस्तुस्थिती असून केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर गल्ली बोळाची सुद्धा दुरावस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिक असोत वा शाळकरी मुलं जेन झी असो वा जेन अल्फा सर्वांचेच कंबरडे मोडलंय ह्या खड्डयांनी… आणि दुर्दैव म्हणजे वर्षानुवर्षे कोट्यावधी रुपये ह्या खड्ड्यात ओतले जातात. यात जसा टक्केवारी चा भाग आहे तसाच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची अनास्था ही कारणीभूत आहे. यातील बहुतांश अधिकारी फिरतात चारचाकीतून, त्यामुळे यांना दुचाकीस्वारांचे आणि पादचाऱ्यांचे दुःख समजणार नाही.
देव न करो पण यांच्या कुटुंबातील कोणी अश्या खड्ड्यात आदळून गंभीर जख्मी झाला तेव्हाच यांचे डोळे उघडतील काय ?
ह्यात सर्वात जास्त दुर्दशा एम एन जी एल आणि 24×7 पाणी पुरवठा योजनेच्या खोदाईच्या कामामुळे झालीये. खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास येतं आहे.
यात सर्वात महत्वाचे आहे ते हे की सदर रस्त्यांची केवळ डागडुजी म्हणजे अशास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविणे हा उपाय नाही तर रस्त्यांची पुनर्बांधणी गरजेची आहे. रस्ते खरवडून, तेथे ग्राऊंटिंग करून मग त्यावर डांबरीकरण करणे हे गरजेचे आहे. केवळ एखादा अपघात झाला किंवा नागरिक संतप्त झाले की खड्ड्यात खडी आणून टाकणे ही मलमपट्टी झाली. यातून काहींचे खिसे भरतात खड्डे नाही.
त्यामुळे ह्या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. यासाठी महिनाभर सर्व अधिकाऱ्यांच्या चारचाकी गाड्या काढून घ्याव्यात व यांना भाग वाटून देऊन दुचाकी वरून फिरायला बाध्य करावे. यात अगदी कलेक्टर, कमिशनर सह सर्वांनाच हे करायला लावलं तर त्यांना नागरिकांच्या वेदना कळतील.
मी काही महिन्यांपूर्वी आपल्याला पत्र लिहून मागणी केली होती की जास्तीतजास्त निधी हा रस्त्यांवर खर्च करावा, सुशोभिकरण, किंवा तत्सम कामात नागरिकांना फार रस नाही.
आता शहरातील सर्वच रस्ते चकाचक करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कंबर कसावी आणि “आपलं पुणे” राहण्यायोग्य करावे हीच सदिच्छा आहे.या निवेदना सोबत दिनांक पंधरा ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केलेल्या निवेदनाचे स्मरण करून दिले आहे
पुणे शहरातील खड्डे नुसतेच डांबर खडी टाकून बुजवू नका त्यांची पुनर्बंधणी करा. अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकीवर फिरायला लावून दुर्दशा झालेल्या रस्त्यांचा पाहणी अहवाल सादर करून पुनर्बंधणीचा आराखडा तयार करा.
RELATED ARTICLES


