मुंबई, 26 ऑगस्ट 2026: नव्या पिढीतील मनोरंजन, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी नोडविन गेमिंगने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ‘स्पेसफेस्ट’ लॉन्च करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा हा भारतातील अंतराळ, विज्ञान, नवकल्पना आणि अंतराळावर आधारित पॉप कल्चरला समर्पित पहिला मोठ्या स्तरावरील कार्यक्रमांपैकी एक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ज्ञान आणि मनोरंजन एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे माननीय मंत्री डॉ. उदय सामंत; महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबालगन, आयएएस; एमआयडीसी मुंबईचे सीईओ श्री. दीपेंद्र सिंह कुशवाह, आयएएस, तसेच प्रायमस पार्टनर्स इंडियाच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आरती हरभजनका आणि आयपीची संकल्पना मांडणारे नोडविन गेमिंगचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी यांचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, ‘स्पेसफेस्ट’ हे अंतराळ संशोधन, नवकल्पना आणि नवीन शोधांना प्रोत्साहन देणारे महत्त्वाचे व्यासपीठ बनण्याचे उद्दिष्ट ठेवते. या आयोजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्पेस-टेक स्टार्टअप्सना त्यांचे नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना सादर करण्याची, नवीन भागीदारी करण्याची तसेच जगभरातील मोठ्या उद्योगसमूह आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे.
प्रमुख पाहुणे श्री. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “माझ्यासाठी अंतराळ म्हटले की चांद्रयानसारख्या मोहिमा तसेच इस्रो आणि नासाच्या कामगिरीची आठवण होत असे. मात्र, स्पेस फेस्टमुळे भारतातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये या क्षेत्राबद्दल किती मोठी उत्सुकता आणि क्षमता आहे, हे मला जाणवले. महाराष्ट्र या उपक्रमात पुढाकार घेत आहे, याचा मला अभिमान आहे. स्पेस फेस्टचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात यावे, असा माझा प्रस्ताव आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्राचे मजबूत वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला अधिक वेळ मिळेल. महाराष्ट्राला केवळ भारतातील अंतराळ क्षेत्रातील आघाडीचे राज्य नव्हे, तर जगातील एक महत्त्वाचे अंतराळ केंद्र बनवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. अंतराळ क्षेत्रातील अर्थव्यवस्थेतून लाखो कोटी रुपयांची मोठी संधी निर्माण होऊ शकते. या संधीचा मोठा वाटा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.”
प्रमुख मान्यवर महाराष्ट्र शासनाचे उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, आयएएस यांनी स्पेस फेस्टचा लॉन्च व्हिडिओ प्रदर्शित केला आणि या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले,”भारताच्या एरोस्पेस, संरक्षण आणि नेव्हिगेशनशी संबंधित सुमारे 25 टक्के यंत्रणा महाराष्ट्रात तयार केल्या जातात. अंतराळ तंत्रज्ञानाचा समावेश असलेले स्वतंत्र एरोस्पेस धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या भारतातील स्पेस-टेक क्षेत्राची किंमत सुमारे 8.5 ते 9 अब्ज डॉलर आहे. 2040 पर्यंत हे क्षेत्र 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कोणतेही क्षेत्र विकसित होण्यासाठी योग्य उद्योग, संस्था, सरकारी यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन-विकास आणि भांडवल यांचा मजबूत सहभाग आवश्यक असतो. स्पेस फेस्ट हा केवळ तीन दिवसांचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रासाठी एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. या उपक्रमामुळे नवीन कौशल्यांना प्रोत्साहन मिळेल आणि अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील. तरुणांना योग्य मार्गदर्शन देणे, त्यांना या क्षेत्राची माहिती आणि अनुभव मिळवून देणे आणि या वाढत्या उद्योगात करिअर घडविण्यास मदत करणे, ही आपली जबाबदारी आहे.”
एमआयडीसी, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्र सिंह कुशवाह, आयएएस यांनी पुढे सांगितले,”महाराष्ट्राला भारतातील वाढत्या अंतराळ क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. स्पेस-टेक क्षेत्रातील स्टार्टअप्सना वाढण्याची, विस्तार करण्याची आणि नवीन संधी मिळवण्याची संधी देणारे मजबूत वातावरण आम्हाला तयार करायचे आहे. या क्षेत्राच्या विकासाला पाठिंबा देऊन एमआयडीसीही या बदलात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. चांगली धोरणे, स्टार्टअप्सना अधिक मदत आणि मजबूत नवकल्पना व्यवस्था यावर आमचा भर आहे. नवीन कल्पना आणि गुंतवणुकीला चालना मिळेल असे वातावरण तयार करणे, तसेच महाराष्ट्राला अंतराळ क्षेत्रातील आघाडीचे केंद्र बनवणे, हे आमच्या मोठ्या उद्दिष्टाचा भाग आहे.”
स्पेसफेस्टच्या लॉन्चबद्दल उत्साह व्यक्त करताना अक्षत राठी, सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, नोडविन गेमिंग, यांनी सांगितले,”माझा ठाम विश्वास आहे की भारतासाठी ही योग्य वेळ आहे. जेव्हा मी डॉ. पी. अनबलगन यांची भेट घेतली आणि ही कल्पना त्यांच्यासमोर मांडली, तेव्हा तरुण भारतीयांना अंतराळ क्षेत्रात काम करण्याच्या आणि करिअर घडवण्याच्या संधी मिळाव्यात, या आमच्या समान उद्दिष्टाशी ही कल्पना लगेच जुळली. अंतराळ क्षेत्राचा विस्तार होत असताना आणखी उद्योग या क्षेत्रात सहभागी होतील, गुंतवणूक वाढेल आणि आपल्या तरुणांना अधिक अनुभव व संधी मिळतील. देशाच्या प्रगतीसोबत आपल्या तरुणांना पुढे येण्याची आणि आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. येत्या काळात भारताच्या अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती होईल, असा मला विश्वास आहे.”
प्रायमस पार्टनर्स इंडियाच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका आरती हरभजनका म्हणाल्या,”या महत्त्वाच्या उपक्रमाचा भाग होताना मला आनंद होत आहे. अंतराळ क्षेत्र आता केवळ सरकारी संस्थांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता त्यात स्टार्टअप्स, उद्योजक, विद्यार्थी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डीप टेक्नॉलॉजी आणि इतर अनेक क्षेत्रांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. नॉलेज पार्टनर म्हणून आम्ही या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करण्यासाठी आणि मोठ्या व महत्त्वाकांक्षी कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत करण्यास कटिबद्ध आहोत. मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की, आजपासून 10–15 वर्षांनी आजची मुले या क्षणाकडे मागे वळून पाहतील आणि ही एका खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सुरुवातीची वेळ होती, असे त्यांना वाटेल.”
नोडविन गेमिंगच्या या उपक्रमाला प्रायमस पार्टनर्स हे नॉलेज पार्टनर म्हणून सहकार्य करणार आहे. या महोत्सवात भारतातील आणि जगभरातील अंतराळ क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची विशेष सत्रे, मार्गदर्शनपर भाषणे आणि पॅनल चर्चा आयोजित केल्या जातील. तसेच महत्त्वाच्या धोरणात्मक घोषणा, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सामंजस्य करार (एमओयूवर स्वाक्षऱ्या) केले जाणार आहेत. तसेच आघाडीच्या स्पेस-टेक स्टार्टअप्सच्या नवीन तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनांचे प्रदर्शनही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.
या महोत्सवात सायन्स-फिक्शन, गेमिंग आणि अंतराळावर आधारित मनोरंजनासाठी विशेष झोन तयार केले जाणार आहेत. यासोबतच सेलिब्रिटींची उपस्थिती, चाहत्यांसाठी विशेष कार्यक्रम, गुंतवणूकदारांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम, प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या कार्यशाळा, हार्डवेअरचे प्रदर्शन आणि एरोस्पेस तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, नवकल्पक आणि उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी विशेष नेटवर्किंगची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळावी आणि नवीन शोधांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘स्पेसफेस्ट’च्या मुख्य कार्यक्रमापूर्वी शाळांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ देखील आयोजित केले जाणार आहे.
अलीकडेच नासाने भारताच्या अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ला चंद्रावर कायमस्वरूपी मानवी उपस्थिती निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामुळे जागतिक अंतराळ क्षेत्रात भारताची वाढती भूमिका दिसून येते. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी सरकारची प्रगत धोरणेही ‘स्पेसफेस्ट’साठी अनुकूल वातावरण तयार करत आहेत. हा महोत्सव अंतराळ क्षेत्राच्या पुढील वाटचालीला नवी दिशा देणारे लोक, कल्पना आणि तंत्रज्ञान एका व्यासपीठावर आणणार आहे.
‘स्पेसफेस्ट’चा पहिला महोत्सव नेहरू सायन्स सेंटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकार तेथे नवीन कायमस्वरूपी प्रदर्शन दालने उभारण्याची योजना आखत आहे. याशिवाय, महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय स्पेस-टेक कार्यक्रमांनाही भेट देणार आहे. यामुळे जागतिक उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधता येईल आणि महाराष्ट्राची स्पेस-टेक क्षेत्रातील भूमिका, भविष्यातील योजना आणि महत्त्वाकांक्षा जगासमोर मांडता येतील.
कार्यक्रमाच्या तारखा आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची माहिती नव्याने सुरू करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केली जाणार आहे.


