आपआपल्या समस्यांसाठी विविध जेष्ठ नागरिक संघ विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असतात ही स्वागतार्ह बाब आहे. पण या
उपक्रमांना जोडून जेष्ठ नागरिक संघांनी वाचक मंडळ
सुरू केले तर राज्यातील वाचन चळवळीला मोठी बळकटी मिळेल आणि जेष्ठ नागरिकांना एक बौद्धिक व्यासपीठ उपलब्ध होईल असे प्रतिपादन निवृत्त माहिती
संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या आनंद मेळ्यात आणि गुण गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महाराष्ट्रात आजच्या घडीला अकराशे जेष्ठ नागरिक संघ असून, या सर्व संघांची सदस्य संख्या जवळपास अठरा लाख इतकी असल्याने यावरून जेष्ठ नागरिकांची शक्ति किती मोठी आहे, याची
कल्पना येते असे सांगून सानपाडा जेष्ठ नागरिक संघाची पूर्णपणे नवीन असलेली कार्यकारिणी अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिलाने अभिनव उपक्रम राबवित असल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना श्री मारुती विश्वासराव यांनी लवकरच जेष्ठ नागरिकांसाठी
शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, कायदे, नियम याबद्दल एक कार्यशाळा घेण्यात येईल असे सांगून कार्यकारिणी जरी स्वतःहून काही उपक्रम आयोजित करीत असते, तरी सर्व सदस्यांनी त्यांच्या काही कल्पना असल्यास , संघाकडून काही अपेक्षा असल्यास त्या अवश्य सुचवाव्यात असे आवाहन केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
सचिव श्री जगदीश टेकावडे
यांनी केले.
या आनंद मेळ्यात ऑगस्ट महिन्यात असलेल्या सर्व सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. त्याच बरोबर विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळविलेल्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.


