Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedभटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा सर्वांगीण विकासासाठी सामाजिक...

भटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा सर्वांगीण विकासासाठी सामाजिक एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार

पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ७५ वा भटके-विमुक्त दिवस रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर, परिसंवाद, ढोल ताशांचा गजर आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या माध्यमातून भटके विमुक्त घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विमुक्त जात समूहाला ब्रिटिश राजवटीत १८७१ सालापासून गुन्हेगार जमात संबोधून तारेच्या कुंपणात बंदिस्त करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने या घटकांना कुंपणाच्या जोखडातून मुक्त केले. या स्वातंत्र्याचा जागर भटके विमुक्त दिनी कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. बंदिस्त तारेच्या कुंपणात जन्म झालेले आणि सध्या १०३ वर्षे वय असलेल्या समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती. महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या अधिपत्याखाली भाटनगर पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, माजी महापौर कविचंद भाट, नगरसदस्य डब्बू आसवानी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त गोरख लिमन, कामगार नेते तथा भाट समाज सेवा ट्रस्टचे शहर अध्यक्ष मनोज माछरे, माजी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, भटक्या-विमुक्त जाती-जमाती सामाजिक आधार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ सावंत, ललित कासार, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके, निवृत्त सहायक आयुक्त सुभाष माछरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते नेताजी शिंदे, अक्षय माछरे, विक्की तामचीकर, भूपेंद्र तामचीकर, अभय भाट, रामचंद्र भाट, संजू घमंडे, सुभाष माछरे, विशाल भाट, धीरज तामचीकर, नरेंद्र तामचीकर, अॅड. वर्षा तामचीकर, वनिता अभंगे, डॉ. स्नेहा माछरे, नम्रता भाट, शीतल भाट, अॅड. अजय नवले, रामभाऊ बाटुंगे, जतन बार्डे, मनोहर अबवेकर, कुलदीप तमायची आदी उपस्थित होते.

भटक्या-विमुक्त समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती तसेच समाजाची दशा आणि विकासाची दिशा या विषयावर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी मार्गदर्शन केले. भटका विमुक्त समाज आजदेखील हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. गुन्हेगार जमातीचा शिक्का पुसून प्रगत जीवनाचा मार्ग अनुसरण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा अंगीकारणे आवश्यक आहे. शिक्षण हा प्रगतीचा एकमेव मार्ग असून शिक्षित समाज उन्नती करू शकतो असे विचार परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.

मंदार देशपांडे म्हणाले, भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या समाजाच्या मागण्या शासन दरबारी सोडवण्यासाठी तसेच महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

समाजसेवा, अध्यात्म, संस्कार आणि मानवकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजप्रबोधन, सदाचार, मानवता, सेवा आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश त्यांनी सातत्याने समाजापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

“शिक्षण, उद्योग आणि स्वावलंबनातून समाजाची प्रगती शक्य” – सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज

“समाजाची प्रगती केवळ आश्वासनांनी किंवा मदतीने होत नाही, तर शिक्षण, रोजगार, उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सक्षम केल्याने होते. आपल्या समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची, प्रत्येक तरुणाला रोजगाराची आणि प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. आपल्या हक्कांच्या मागण्या शासनासमोर ठामपणे मांडून त्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद निर्माण करूया आणि शिक्षण, उद्योग व स्वावलंबनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणूया,” असे प्रतिपादन सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांनी केले. तारेच्या कुंपणातील कटू आठवणी आणि त्यावेळी झालेला अन्याय यावेळी त्यांनी विशद केला. भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासमोर भटक्या विमुक्त जातीचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यावेळी झालेल्या भेटीचे प्रसंग देखील शिवलाल यांनी सांगितले. ७५ वा भटके-विमुक्त दिवस हा समाजाच्या सामाजिक प्रगतीचा, एकजुटीचा आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षण, रोजगार, सामाजिक स्थैर्य आणि समाजाचा मुख्य प्रवाहातील सहभाग वाढविण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

“शिक्षण, संघटन आणि एकजूट हीच समाजाची ताकद” – विशेष अधिकारी किरण गायकवाड

“भटक्या-विमुक्त समाजाची लढाई ही एका जातीची नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीची लढाई आहे. त्याचप्रमाणे आपल्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपल्या समाजाचा संघर्षमय इतिहास विसरता कामा नये. मानसिक गुलामगिरीची कुंपणे तोडण्यासाठी शिक्षण, संघटन आणि एकजूट हीच आपली ताकद आहे. प्रत्येक मुलगा-मुलगी शिकली पाहिजे. आपल्या समाजाचे भविष्य घडविण्यासाठी निरंतर सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. मनोज माछरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. समाजाच्या हक्क अधिकारासाठी संघटनात्मक एकजूट उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सायंकाळच्या सत्रात निर्मिक आर्ट्स मीडिया प्रस्तुत ‘भटके-विमुक्त लोकसंस्कृतीचा जागर’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील कला, संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लोककलांच्या सादरीकरणासह मोरया ढोल-ताशा पथकाच्या सादरीकरणाने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आरोग्य उपक्रमांतर्गत ३१ नागरिकांनी रक्तदान केले, तर २१० नागरिकांनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. रक्तदान हे जीवनदानाचे कार्य असून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश रावळकर यांनी तर आभार विष्णू भाट यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments