पुणे, दि. ३ (जिमाका): जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सूक्ष्म व लघू उद्योजकांना राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी पात्र सूक्ष्म व लघू उद्योग घटकांनी ३० सप्टेंबर २०२६ अखेर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हा पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये व द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये तसेच मानचिन्ह देण्यात येते. पुरस्कारासाठी उद्योग घटकाची उद्यम नोंदणी १ जानेवारी २०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे. तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून सलग उत्पादन प्रक्रियेत असावा. संबंधित सूक्ष्म व लघू उद्योग कोणत्याही संस्था अथवा बँकेचा थकबाकीदार नसावा.
शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार पात्र सूक्ष्म व लघू उद्योगांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी विहित नमुन्यातील अर्ज ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज व पुरस्कारासंदर्भातील अधिक माहितीसाठी उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, पुणे, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे-५, दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३७९६६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000


