पुणे : पारंपरिक बँड चे मंगल स्वर… ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण आणि दहीहंडी फोडण्याची उत्सुकता… या उत्सवी वातावरणात विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद भावूक करणारा ठरला. समाजातील वंचित, दिव्यांग आणि विशेष मुलांनाही दहिहंडीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने ‘आपली दहिहंडी’ हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुलाच्या प्रांगणात झालेल्या या उपक्रमात धर्मवीर शंभूराजे अनाथाश्रमातील विशेष मुला-मुलींनी दहिहंडी फोडण्याचा आनंद घेतला.
यावेळी विशेष मुलांचे संगोपन करणाऱ्या मावशी शिवकन्या अमृत बेळगे यांचा ‘स्व. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ माता यशोदा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनच्या अध्यक्ष डॉ. शुभदा जठार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानंतर गोविंदांनी दहीहंडी फोडली. बँडच्या तालावर विशेष मुलांनी मनसोक्त नृत्य करत आनंद व्यक्त केला. डॉ. मिलिंद भोई, बाळासाहेब पाटोळे, रुपाली देशपांडे, अरुणकुमार बाभुळगांवकर,होनराज मावळे, नंदिनी देवकर यावेळी उपस्थित होते.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, दहिहंडी हा केवळ उत्सव नसून आनंद वाटण्याची आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याची परंपरा आहे. वंचित आणि विशेष मुलांना या उत्सवाचा आनंद घेता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने ‘आपली दहिहंडी’ मागील २४ वर्षे सातत्याने आयोजित केली जात आहे.
दहिहंडी फोडल्यानंतर सहभागी मुलांसाठी सुग्रास पुरणपोळीचे भोजन आयोजित करण्यात आले. तसेच गोपाळकाल्याच्या निमित्ताने संबंधित संस्थेला शिधाही देण्यात आला. या उपक्रमाला श्री दैवज्ञ नामदेव शिंपी समाज, कसबा पेठ यांचे विशेष सहकार्य लाभले.


