Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे आणि संवाद महत्त्वाचा* *— प्रमुख...

मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे आणि संवाद महत्त्वाचा* *— प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए. एस. शेंडे*

 

 

पुणे, दि. ७ (जिमाका) : न्यायप्रक्रियेकडे केवळ विजय किंवा पराभवाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमळपणाला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू ए. एस. शेंडे यांनी केले.

 

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

कार्यक्रमास सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिरीषकुमार हाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेवती आर. देशपांडे तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम बबन भुजबळ उपस्थित होते.

 

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती शेंडे म्हणाल्या की, मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि त्यांच्या भावनांचा विचार करून संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेसाठी संभाषण चातुर्य आवश्यक असून संतुलन राखणे गरजेचे आहे. मध्यस्थाने स्वतःची निर्णायक भूमिका घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिरीषकुमार हाडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची कार्यपद्धती, मध्यस्थाची भूमिका आणि मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती रेवती आर. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणाऱ्या विविध अडचणी तसेच त्या दूर करण्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन केले. तसेच १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम बबन भुजबळ यांनीही सर्व वकिलांनी मध्यस्थी प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षकारांना त्वरित व समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments