Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorized*२०३२ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुण्याची ‘यूसीआय’कडून पाहणी* ...

*२०३२ रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुण्याची ‘यूसीआय’कडून पाहणी* *२२ सप्टेंबरला मॉन्ट्रियलमध्ये महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पुण्याची उमेदवारी करणार सादर*

 

 

पुणे, ९ सप्टेंबर : २०३२ मध्ये होणाऱ्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुण्याने सादर केलेल्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल सायकलिंग युनियनच्या (UCI) तीन सदस्यीय शिष्टमंडळाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI)च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान पुण्याची पाहणी केली.

 

या पाहणीदरम्यान प्रस्तावित रेस इन्फ्रास्ट्रक्चर, स्पर्धेची ठिकाणे, विविध स्पर्धांसाठीचे प्रारंभ व अंतिम ठिकाण, रेस मार्ग, निवास व्यवस्था, प्रेक्षक व्यवस्थापन, तांत्रिक आवश्यकता तसेच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनासाठीची प्रशासकीय व कार्यकारी तयारी यांचा आढावा घेण्यात आला.

यूसीआयच्या शिष्टमंडळात स्पोर्ट्स डायरेक्टर पीटर व्हॅन डेन अबीले, स्ट्रॅटेजिक स्पोर्ट्स मॅनेजर मॅथ्यू नाइट आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्स अवॉर्ड्स अँड प्रोजेक्ट्स कोऑर्डिनेटर गिलॉम रोमियर यांचा समावेश होता. सीएफआयच्या शिष्टमंडळात सरचिटणीस मनिंदर पाल सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील, तांत्रिक संचालक अजित सिंग, हाय परफॉर्मन्स डायरेक्टर धर्मेंद्र लांबा, मॅनेजर-इंटरनॅशनल रिलेशन्स विनय कुमार सिंग, तांत्रिक तज्ज्ञ एम. के. पाशा आणि वरिष्ठ कार्यकारी अधिकारी अक्षांका दहाट यांचा समावेश होता.

 

पाहणीदरम्यान शिष्टमंडळाने बालेवाडी क्रीडा संकुलाला भेट देऊन विविध स्पर्धांसाठी प्रस्तावित प्रारंभ व अंतिम ठिकाणांची पाहणी केली. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसराची आणि आजूबाजूच्या भागाची पाहणी करून रेस मार्गाचे नियोजन व स्पर्धेच्या आयोजनाच्या दृष्टीने त्याचा आढावा घेतला.

याशिवाय जे. डब्ल्यू. मॅरियट पुणे, द रिट्झ-कार्लटन, पुणे तसेच अधिकृत निवास आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रस्तावित इतर हॉटेल्समधील आदरातिथ्य सुविधांचीही पाहणी करण्यात आली.

 

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सीएफआय आणि पुणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यूसीआयच्या शिष्टमंडळासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले.

 

शिष्टमंडळाला पुणे ग्रँड टूरचा प्रत्यक्ष कार्यानुभवही देण्यात आला. पुणे ग्रँड टूरच्या पहिल्या हंगामात वापरण्यात आलेले रेस मार्ग, प्रत्यक्ष रेस काफिला आणि आयोजनासाठी वापरण्यात आलेली कार्यपद्धती यांचे सादरीकरण करण्यात आले.

 

“यूसीआयच्या अधिकाऱ्यांच्या पुणे दौऱ्यामुळे २०३२च्या जागतिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी महाराष्ट्रात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून मिळालेला अनुभव, राज्यातील पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय तयारी यामुळे ही उमेदवारी पुढे नेताना आमचा आत्मविश्वास वाढला आहे. २२ सप्टेंबरला कॅनडातील मॉन्ट्रियल येथे महाराष्ट्राची २०३२च्या स्पर्धेबाबतची संकल्पना सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

 

पुणे ग्रँड टूरच्या आयोजनातून विकसित झालेला अनुभव, पायाभूत सुविधा तसेच विविध संस्थांमधील समन्वय हा मोठ्या स्तरावरील यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी भक्कम पाया असल्याचे शिष्टमंडळासमोर मांडण्यात आले.

 

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी मॉन्ट्रियल, कॅनडा येथे होणाऱ्या अधिकृत उमेदवारी सादरीकरणासाठी महाराष्ट्राचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या महिन्यात कॅनडाला रवाना होणार आहे. या शिष्टमंडळात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांचा समावेश असेल.

 

यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी पुण्याची संकल्पना, प्रस्तावित पायाभूत सुविधा, आयोजन क्षमता, प्रशासकीय तयारी तसेच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे सहकार्य याबाबतचे सादरीकरण शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे.

 

२०३२च्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी यजमान शहर आणि देशाची घोषणा २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या यूसीआय काँग्रेसमध्ये होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राच्या उमेदवारीमागे पुण्याला जागतिक सायकलिंगचे केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच भारतातील आंतरराष्ट्रीय सायकलिंग परिसंस्था अधिक सक्षम करणे आणि या भागासाठी दीर्घकालीन क्रीडा, पायाभूत सुविधा तसेच आर्थिक वारसा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे जितेंद्र डूडी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments