पुणे, दि. ९ : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत सुरू असलेल्या दावे व हरकतींच्या कालावधीत ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण २१ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये फॉर्म ६ चे १२ हजार ४७२, फॉर्म ७ चे ६८१ आणि फॉर्म ८ चे ८ हजार ३६८ अर्ज आहेत.
मतदार यादीत नवीन मतदार म्हणून नाव नोंदविणे, नाव वगळण्याबाबत हरकत नोंदविणे तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र नागरिकांना ही प्रक्रिया ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.
नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी किंवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व अन्य तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी मतदार यादी तपासून आपले नाव समाविष्ट नसल्यास किंवा मतदार यादीतील तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी आवश्यक अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


