पुणे : बाजीरावांचा इतिहास शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवलाच गेला नाही. हा इतिहास कुठे दडवून ठेवला आहे, हे मला माहीत नाही. ब्रिटिशांच्या काळापासून आजपर्यंत आपण ज्या पुस्तकांमधून इतिहास शिकलो, त्यामध्ये ब्रिटिशांचा इतिहास शिकलो, मुघलांचा इतिहास शिकलो. इंग्लंडचा संपूर्ण इतिहास शिकवला गेला. मात्र बाजीराव पेशव्यांचा इतिहास अपेक्षित पद्धतीने शिकवला गेला नाही, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार २०२६’ एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांना प्रदान करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर, मएसो सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, प्रमुख वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, मोरेश्वर गांगल, उमेश देशमुख आणि चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल पुष्पगुच्छ आणि रोख २५ हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
हरिभाऊ बागडे म्हणाले, आज आपल्याला बाजीरावांसारखे होणे जमणार नाही. आता तलवारीची लढाई नाही, तर डोक्याची लढाई आहे. आज आपल्याला शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गरिबी दूर करण्याचे प्रभावी माध्यम शिक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे.
बीरेंद्रसिंह धनोआ म्हणाले, आपल्या देशातील लष्करी कमांडर्सबद्दल काहीच शिकवले गेले नाही. आम्ही बाजीराव पेशव्यांबद्दल शिकलो नाही, भारतावर ब्रिटिशांनी २०० वर्षे राज्य केले. आपण त्याबद्दल का रडत बसायचे? आपल्या मुलांना आपण हे शिकवले पाहिजे की आपण हरलो का? आपण या अवस्थेपर्यंत का पोहोचलो? आपण नेहमीच शूर आणि धाडसी होतो. आपले सैनिक अतिशय शूर आहेत. पण आपण एकत्र नव्हतो. आपण आपापसातच लढत होतो.
आपल्या अभ्यासक्रमात सर्वत्र भारतीय लढाया शिकवल्या पाहिजेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या पराभवांबद्दल आणि ते का झाले याबद्दल शिकवले पाहिजे. आपण काय केले आणि कुठे चुकलो, हे शिकवले पाहिजे.एक राष्ट्र म्हणून आपणही कायम अशी शपथ घेतली पाहिजे की आपण एकत्र राहू आणि पुन्हा कधीही कोणालाही आपल्यात फूट पाडू देणार नाही.
सुप्रिया बडवे म्हणाल्या, बाजीराव पेशवे हे दूरदृष्टी असणारे सेनानी होते. इतिहासाचा अभ्यास करावा, मात्र तो केवळ अभ्यासून सोडू नये; त्यातून शिकावे, प्रेरणा घ्यावी आणि ती आपल्या आयुष्यात आचरणात आणावी.
डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे हे शेवटपर्यंत अपराजित राहिलेले सेनापती होते. मात्र, त्यांच्या नावासोबत प्रामुख्याने मस्तानीचा संदर्भ जोडला जातो. बाजीराव-मस्तानी यांच्या नावाने चित्रपटही तयार झाला. त्या काळात क्षात्रधर्मानुसार अशा प्रकारचे विवाह होत असत. मस्तानी यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे बाजीरावांच्या राजकारणावर किंवा त्यांच्या कर्तृत्वावर कोणताही परिणाम झाला नव्हता. त्यामुळे बाजीराव आणि मस्तानी यांच्याबद्दल मनात कोणताही कलुषित भाव ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.
कुंदनकुमार साठे म्हणाले, बाजीराव पेशवे हे अपराजित सेनानी होते. त्यांचे कर्तृत्व पुढील पिढीला कळण्यासाठी बाजीराव पेशवे यांच्या पुढील जयंतीपर्यंत विधानभवनात त्यांचे तैलचित्र लावले
गेले पाहिजे.


