Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedमोफत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद १२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून...

मोफत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद १२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून साकारला बाप्पा

 

पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने मांजरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगर आणि साडेसतरा नळी परिसरातील १२५ हून अधिक विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमात सहभागी होत स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव घेतला.

 

संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक छाया संजीव गदादे यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळा पूर्णपणे मोफत होती. विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले नाही, तर मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण साहित्य आणि साधनेही फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये पर्यावरणपूरक शाडू माती, गणेशमूर्तीचा बेस, मूर्ती घडविण्याची विविध साधने, रंग, ब्रश तसेच सजावटीच्या साहित्याचा समावेश होता.

 

कार्यक्रमाची सुरुवात फाउंडेशनचे उपाध्यक्ष सूरज चव्हाण आणि संगीता दिवेकर यांच्या हस्ते भगवान श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी स्वप्निल चतुर, अभिषेक सागरे, अक्षय दिवेकर, जान्हवी तायडे, अमृता भोसले, जयश्री गदादे, सार्थक खांडके,छाया गदादे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

 

प्रशिक्षक वेदिका हिंगमिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती हाताळण्यापासून मूर्तीला योग्य आकार देणे, विविध अवयव व बारकावे साकारणे, मूर्तीची रचना समतोल ठेवणे, बेसवर मूर्ती बसविणे, रंगकाम तसेच सजावट करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष शिकविली. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीची कला जवळून समजून घेत स्वतःच्या हाताने बाप्पा साकारण्याचा आनंद मिळाला.

 

छाया संजीव गदादे म्हणाल्या, गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. मात्र, त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पाण्यात सहज विरघळत असल्याने पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. लहान वयातच मुलांना पर्यावरणपूरक पर्यायांची ओळख करून देणे आणि ‘बाप्पाची भक्तीही, पर्यावरणाची काळजीही’ हा विचार त्यांच्या मनात रुजविणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments