पुणे, दि.२३: गंभीर आजाराने मरण पावणाऱ्यांपेक्षा रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी देऊ नये. वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आहेरराव यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने आयोजित अखिल मंडई मित्र मंडळ चिंचवड येथे लोकसंवाद कार्यक्रमात श्री. आहेरराव यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ उपस्थित होते.
रस्ते वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामार्ग वाहतूक पोलीस तसेच मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन चालवताना सुरक्षितपणे चालवावे, विनापरवाना वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविल्यास ५ हजार रुपये दंड आहे. सिग्नल तोडल्यास पाचशे रुपये दंड, वारंवार सिग्नल तोडून जाण्याची चूक केल्यास पंधराशे रुपये पर्यंत दंड व तीन महिन्यासाठी परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात येतो. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
दुचाकी चालविताना तसेच मागे बसताना हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहनाची वेगमर्यादा पाळावी आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.
००००


