पुणे, दि. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी, इयत्ता १२ वीमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच सन २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करून विद्यार्थ्यांना विहित वेळेत जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, एसईबीसी, विमाप्र, इतर मागासवर्ग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची समितीस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी त्रुटीपूर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडिया व इतर माध्यमांतून या विशेष मोहिमेची माहिती देऊन व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करण्यात येत आहे.
जातवैधता प्रमाणपत्राच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित समित्यांमार्फत अर्जदारांना एसएमएस, ई-मेल तसेच पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अनेक अर्जदार व विद्यार्थ्यांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदाराची आहे.
जातवैधता प्रमाणपत्राअभावी पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी ज्या अर्जदारांनी अथवा विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी. त्यामुळे समितीला प्रकरणांवर विहित वेळेत निर्णय घेणे शक्य होईल.
अर्जदार व विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीच्या महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक श्रीमती दीपा-मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.


