हिऱ्यांची दुर्मीळता, त्यांच्याशी जोडलेला अर्थ आणि कायम टिकणारे भावनिक नाते यांच्याशी ग्राहकांना पुन्हा जोडण्याच्या समान उद्दिष्टासाठी ‘द डायमंड कलेक्टिव्ह’ उद्योगातील विविध घटकांना एकत्र आणणार.
लंडन, युनायटेड किंगडम, 24 सप्टेंबर 2026 : नॅचरल डायमंड कौन्सिल आता ‘द डायमंड कलेक्टिव्ह’ या नव्या रूपात कार्यरत होणार असून, संस्थेने आज आपल्या नव्या जागतिक धोरणाची घोषणा केली. नैसर्गिक हिऱ्यांना संस्कृतीशी पुन्हा जोडणे, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे आणि दीर्घकालीन महत्त्व कायम राखणे, हा या धोरणाचा उद्देश आहे.
नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँबर पेपर यांनी गेल्या सहा महिन्यांत उत्पादक, किरकोळ विक्रेते, ब्रँड्स, सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती आणि ग्राहकांशी केलेल्या चर्चेतून हे धोरण आकाराला आले आहे. लक्झरी उत्पादनांचा शोध घेण्याची, त्यांचे मूल्य ठरवण्याची आणि त्यांची खरेदी करण्याची ग्राहकांची पद्धत मूलभूतरीत्या बदलत आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर हे धोरण आखण्यात आले आहे. नैसर्गिक हिऱ्यांविषयीचे आकर्षण पुन्हा निर्माण करणे आणि या आकर्षणाचे रूपांतर सातत्यपूर्ण मागणीत करणे, हे ‘द डायमंड कलेक्टिव्ह’चे स्पष्ट उद्दिष्ट आहे.
संस्कृती, किरकोळ विक्री, विश्वास, समर्थन, डिजिटल माध्यमातून होणारा शोध, भागीदारी आणि उद्योगातील विविध घटकांमधील समन्वय यांची सांगड घालत हे धोरण पुढील तीन प्राधान्यांवर आधारित आहे :
● इन्स्पायर (INSPIRE) – संस्कृती, सर्जनशीलता आणि जागतिक स्तरावर जोडलेल्या कथांच्या माध्यमातून नैसर्गिक हिऱ्यांविषयी आकर्षण निर्माण करणे आणि ग्राहकांना त्यांचा विचार करण्यापासून प्रत्यक्ष खरेदीपर्यंत नेण्यासाठी स्पष्ट मार्ग तयार करणे.
● प्रोटेक्ट (PROTECT) – स्पष्ट माहिती, पारदर्शकता आणि तथ्यांच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणे, चुकीच्या माहितीला आव्हान देणे आणि नैसर्गिक हिरे व कृत्रिम हिरे यांच्यातील फरक स्पष्ट करणे.
● युनाइट (UNITE) – विकासाच्या समान उद्दिष्टांसाठी उत्पादक, किरकोळ विक्रेते, ब्रँड्स, डिझायनर्स आणि नव्या क्षेत्रांतील प्रतिनिधींना एकत्र आणणे.
या तीन प्राधान्यांमधून धोरणातील महत्त्वपूर्ण बदल स्पष्ट होतो. आता नैसर्गिक हिऱ्यांच्या श्रेणीचा केवळ बचाव करण्याऐवजी त्यांच्याविषयीचे आकर्षण पुन्हा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. स्वतंत्र मोहिमांऐवजी परस्परांशी जोडलेला जागतिक विकास कार्यक्रम राबवण्यात येणार असून, केवळ उद्योगाचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी सामूहिक कृती, गुंतवणूक आणि मोजता येण्याजोगे व्यावसायिक परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
नव्या पिढीतील जागतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे धोरण प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. यामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत मोहिमा, सर्वत्र वापरता येईल असे ‘ट्रस्टमार्क’, हिऱ्यांचे मूळ आणि ते कुठून आले आहेत याविषयी अधिक प्रभावी माहिती, किरकोळ विक्रेते आणि ब्रँड्ससोबत नव्याने बळकट करण्यात येणाऱ्या भागीदाऱ्या तसेच एआय आणि डिजिटल माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुंतवणूक यांचा समावेश असेल. चुकीच्या माहितीला तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे अधिक प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे, हिरे उत्पादक देशांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि उद्योगातील सामूहिक नेतृत्वासाठी नवी व्यासपीठे निर्माण करणे यासाठीही आणखी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
याविषयीची अधिक माहिती तसेच वरिष्ठ स्तरावरील आणखी नियुक्त्यांची घोषणा येत्या काही महिन्यांत करण्यात येणार आहे.
या धोरणामुळे ग्राहकांच्या नैसर्गिक हिऱ्यांविषयीच्या भावना आणि त्यांच्या खरेदीविषयक निर्णयांमध्ये बदल होत आहे का, हे मोजण्यासाठी नवा ‘डायमंड डिझायर इंडेक्स’ सुरू करण्यात येणार आहे. अमेरिका, भारत आणि चीनमधील प्रारंभिक आधारभूत आकडेवारीच्या आधारे या निर्देशांकाची सुरुवात होईल. नैसर्गिक हिरे खरेदी करण्याचा विचार, खरेदीची इच्छा, ग्राहकांची भावना आणि इतरांना खरेदीची शिफारस करण्याची तयारी अशा बाबींचा या माध्यमातून मागोवा घेण्यात येईल. त्यामुळे नैसर्गिक हिऱ्यांविषयीच्या आकर्षणाचे जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण चित्र उपलब्ध होईल तसेच ग्राहकांचे वर्तन आणि मागणीतील बदलांविषयी दरवर्षी अहवाल सादर करणे शक्य होईल.
या धोरणांतर्गत सहभागाचे अधिक व्यापक प्रारूपही आणण्यात येणार आहे. त्यामुळे हिऱ्यांच्या मूल्यसाखळीतील विविध संस्था समान प्राधान्यांसाठी आपले कौशल्य, दृष्टिकोन आणि सहकार्य देऊ शकतील. यामुळे नैसर्गिक हिरे क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाला आकार देण्यात आणि त्यासाठीच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात उद्योगातील अधिक घटकांना अर्थपूर्ण भूमिका बजावता येईल.
बहुतांश बाजारपेठांमध्ये ‘द डायमंड कलेक्टिव्ह’ हे संस्थेचे सार्वजनिक स्तरावरील नवे नाव असेल, तर ‘नॅचरल डायमंड कौन्सिल’ हे संस्थेचे कायदेशीर नाव कायम राहील. हा बदल केवळ नव्या ब्रँड ओळखीपुरता मर्यादित नाही. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून, पुराव्यांच्या आधारे आणि सामूहिक सहभागातून काम करण्याच्या अधिक महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाचे तो प्रतिनिधित्व करतो.
‘द डायमंड कलेक्टिव्ह’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँबर पेपर म्हणाल्या,
“नैसर्गिक हिरे हे पृथ्वीवरील सर्वात दुर्मीळ खजिन्यांपैकी एक आहेत. अब्जावधी वर्षांच्या प्रक्रियेतून पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खोलवर त्यांची निर्मिती होते. प्रत्येक हिरा पूर्णपणे वैशिष्ट्यपूर्ण असतो. मात्र, आपण त्यांना जो अर्थ देतो, त्यातच त्यांचे सर्वात मोठे मूल्य दडलेले असते. आपल्या आयुष्यातील ज्या व्यक्ती, वचने आणि क्षण आपण कधीही विसरू इच्छित नाही, त्यांच्याशी हिरे जोडलेले असतात.
“ही जबाबदारी स्वीकारल्यापासून मी आमच्या उद्योगातील आणि त्याबाहेरील अनेकांशी संवाद साधला आहे. त्यांचा दृष्टिकोन, अनुभव आणि नैसर्गिक हिऱ्यांवरील विश्वासातून या धोरणाला आकार मिळाला आहे. या संवादातून पुढे असलेल्या संधींबाबत माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्याचबरोबर एकत्रितपणे काम केले, तरच या संधीचा पूर्ण लाभ घेता येईल, हेही स्पष्ट झाले आहे.
“याच सामूहिक महत्त्वाकांक्षेच्या बळावर ‘द डायमंड कलेक्टिव्ह’ पुढे वाटचाल करणार आहे. नैसर्गिक हिऱ्यांची असामान्य कथा संस्कृतीचा भाग बनवणे, त्यांचे वेगळेपण अधोरेखित करून त्यावरील विश्वास अधिक दृढ करणे आणि नव्या पिढीला नैसर्गिक हिऱ्यांची निवड करण्यासाठी प्रेरित करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे नैसर्गिक हिऱ्यांविषयी दीर्घकाळ टिकून असलेल्या भावनिक आकर्षणाचे रूपांतर कायमस्वरूपी मागणीत करण्यात येईल.”


