पुणे : लोककलेचे व्रत घेणारी मंडळी ही वंदनीय आहेत. जगभरात लोककलेचा वारसा कोठेही नाही, हा फक्त आपल्याकडे असून आपण तो जपणे महत्वाचे आहे. डॉ.रामचंद्र देखणे आणि आता डॉ.भावार्थ देखणे यांसारखे ही कला जपत असून लोककला ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे च्या वतीने प्रतिवर्षी शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळा सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप प्रशालेच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, पूजा देखणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त भारुडकार डॉ. भावार्थ देखणे यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपये ११ हजार, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्व.रघुनाथ कचरे यांच्या स्मरणार्थ पुरस्काराचा ११ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे २७ वे वर्ष होते.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, साहित्य म्हणून लोककलेला समजणे गरजेचे आहे. लोककला किती महत्वाची आहे, याचा विचार करायला हवा. शाहिरी मध्ये साहित्य आहे, हे अनेक नामवंत लेखकांना मान्य होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या लेखणीतून पोवाडे लिहिले. आता पुण्यात शताब्दी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे सारस्वतांच्या दरबारात लोकशाहीरांना प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रा.संगीता मावळे म्हणाल्या, शाहीर हिंगे यांनी कलेला स्वत:चा श्वास आणि उच्छवास मानले. ध्येय निष्ठा आणि कलानिष्ठा हे त्यांचे गुण होते. त्या मार्गावर चालत असलेल्या युवा कलावंतांना या पुरस्काराने दरवर्षी गौरविले जाते, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर डॉ.भावार्थ देखणे व सहकाऱ्यांचा ‘बहुरूपी भारूड’ हा कार्यक्रम झाला. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. पुष्कर औरंगाबादकर यांनी आभार मानले.


