पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा..

तारां कित Avatar

पिंपरी, दि. २० डिसेंबर २०२३ :- देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी आम्ही निष्ठापूर्वक काम करू तसेच सर्व धार्मिक,भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी हिंसाचाराचा अवलंब न करता शांततामयी आणि संविधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न चालू ठेवू असा निर्धार करून अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव आणि त्यांची माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या निर्देशानुसार १८ डिसेंबर हा दिवस दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशा सुचनेनूसार महापालिकेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप आयुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद सबनीस, पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव तापकीर, महापालिका प्राथमिक शिक्षक संघटनेचे चंद्रकांत झगडे, महानगरपालिका प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रल्हाद गिरी गोसावी, रेल्वे संघटनेचे सुभाष मंत्री, केंद्र सरकार निवृत्ती वेतन संघटनेचे नारायण सोनार, राज्य शासकीय संघटनेचे श्रीराम मोने, जिल्हा परिषद निवृत्त संघटनेचे दिपक रांगणेकर, महिला संघटना प्रतिनिधी मंगला नायडू, प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम परबत गुरुजी, पदाधिकारी गणेश विपट, डी.डी. फुगे, आर.डी.गायकवाड, यशवंत चासकर, ए.पी.भावसार, उमेश बांदल, कालिंदी डांगे, विजया जीवतोडे, कुमुदिनी घोडके ,शैलजा कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

अल्पसंख्याक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच त्यांना येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करता येईल याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक नागरिकांच्या हक्कांना मान्यता देण्यामध्ये आणि त्यांना संरक्षण देण्यामध्ये जरी प्रगती झाली असली तरीही यामध्ये आव्हाने अजूनही कायम आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशासनाने तसेच नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच राष्ट्रीय एकात्मता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार रामदास जाधव यांनी मानले.

Tagged in :

तारां कित Avatar