Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवी दिल्ली येथील ६५ वा ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील रमेश...

नवी दिल्ली येथील ६५ वा ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील रमेश थोरात यांना प्रदान*

 

 

पुणे : सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली येथे ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात ललित कला अकादमी पुरस्कार पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार रमेश विठ्ठल थोरात यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतातील समकालीन दृश्यकलेतील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार आहे. ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशभरातून २४९५ कलाकारांकडून ६हजार १७५ कलाकृती प्राप्त झाल्या व त्यातील २७० कलाकृतींची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली. त्यातून २० कलाकृती पारितोषिकासाठी निवडल्या गेल्या. प्रत्येकी ₹ २,००,०००/- रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि अंगवस्त्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रमेश थोरात यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची चित्रप्रदर्शने भारतात व परदेशातही झाली आहेत आणि त्यांची चित्रे संग्रहितही करण्यात आली आहेत.

त्यांच्या चित्रांबद्दल सांगायचे झाले तर त्यांची चित्रनिर्मिती म्हणजे वर्षानुवर्षांच्या तपस्येची प्रक्रिया आहे. चित्रणात प्रकर्षाने जाणवतो तो माती व सूर्यकिरणांचा पोत, भक्तिभावाची चिन्हे, गूढ विचार व आध्यात्मिक पुनरावृत्ती. या प्रक्रियेत विचार व रंगांचे थरावर थर संयमाने देऊन आध्यात्मिक परिणाम साधला जातो. एक उत्कृष्ट चित्र पारंपरिक रूढीप्रमाणे नैसर्गिकरीत्या परिपूर्ण होत जाते व हेच चित्र पाहणाऱ्याला चित्रमय गूढ दुनियेत प्रवेश करण्याचे आमंत्रण देते. या प्रवासात प्रचंड समाधान मिळते आणि डोळे व मन सुखावतात. प्रत्येक कलारसिकाला चित्रामधून वेगळा वैचारिक पैलू उलगडण्याचे स्वातंत्र्य चित्रकाराने बहाल केले आहे; म्हणूनच त्यांच्या चित्रांना नावे नाहीत.

चित्रणात केंद्रबिंदू, अंकुर, अंतर्मनातील ऊर्जा, पात्र व पोतामधील प्रचंड स्पंदने जाणवतात. चित्रणात कथा किंवा वास्तववादी विषय नसून अंतर्मनातील भावनिक व आध्यात्मिक स्थित्यंतरे आहेत. या आध्यात्मिक बीजातूनच सृजनात्मक विचारांचा कल्पवृक्ष वाढीस लागतो.

या चित्रनिर्मितीत चित्रकाराने प्रामाणिकपणे केलेली परंपरागत साधना ही निश्चितच कलाकाराला आणि चित्र पाहणाऱ्या कलारसिकाला परमानंदाची अनुभूती देते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments