Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorized*दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे...

*दिवेआगर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत देण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश*

 

 

पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन नारायणराव जावळे आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याशी तातडीने संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. बचाव व शोधकार्य, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक प्रशासकीय मदत तसेच पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

 

आळंदी येथील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. पर्यटनादरम्यान काही विद्यार्थी समुद्रात उतरले असता पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व शोधकार्य सुरू केले. शोधमोहीमेदरम्यान सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून ते बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांबाबतची वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे.

 

या दुर्दैवी घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

 

घटनेनंतर पुणे आणि रायगड जिल्हा प्रशासनामध्ये आवश्यक समन्वय ठेवण्यात येत असून, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती प्रशासकीय मदत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन नारायणराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत असून, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणाही घटनास्थळी कार्यरत आहे.

 

दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी प्रशासनाकडून संपर्क साधण्यात येत असून, त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. घटनेबाबतची पुढील वैद्यकीय, कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाही संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments