भारतीय समाजात खरीखुरी समानता निर्माण व्हावी यासाठी, ज्या ज्या मागास वर्गाला घटनेने आरक्षण दिले आहे,त्या आरक्षणाचा लाभ पहिल्याच पिढीला मिळावा, जेणेकरून त्या त्या मागास वर्गातील खऱ्याखुऱ्या गरजू मुलामुलींना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि स्वतःच्याच समाजातील राजकीय, आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक दृष्ट्या प्रबळ असलेल्या मुलामुलींशी त्यांना स्पर्धा करावी लागणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. भूतान मध्ये नुकत्याच झालेल्या पंधराव्या स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील, कार्यातील एक
समान धागा म्हणजे जाती
पद्धतीचे निर्मूलन हा आहे.
त्यामुळे या तिन्ही महापुरुषांच्या अनुयायांनी
निदान जात व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच ही अपेक्षा सरकारकडून न करता, त्या त्या समाजाच्या मंडळानी, नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजे,असेही आवाहन त्यांनी केले.
संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना लेखक सुधीर सेवेकर यांनी त्यांच्या भाषणातून सावरकरांची विद्यान निष्ठा आचरणात आणणे किती महत्वाचे आहे, हे विशद केले.
संमेलनाचे प्रास्ताविक करताना,छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र
मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊ
सुरडकर यांनी मंडळाच्या
वाटचालीचा आढावा सादर केला.
संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा मगर यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले.
या संमेलनात विविध वक्त्यांनी सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले.


