Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न*

महिला आरोग्य, स्वच्छता, रक्तक्षय व पोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न*

 

 

पुणे, दि. ४: सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा दवाखाना, कुरकुंभ येथे महिला आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, रक्तक्षय व पोषण या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिराजुद्दीन जमादार यांनी सेवा संकल्प योजनेची माहिती देत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

 

डॉ. ओंकार शेलारे यांनी रक्तक्षय व पोषण या विषयावर सविस्तर माहिती देताना संतुलित आहाराचे महत्त्व, शरीरासाठी आवश्यक विविध पोषक घटक, रक्तक्षयाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच नियमित रक्त तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले.

 

तसेच वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील स्वच्छता आणि रक्तक्षय याबाबत सोप्या व प्रभावी पद्धतीने जनजागृती करण्यात आली. यासाठी विविध माहितीपूर्ण पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्या माध्यमातून उपस्थित महिलांना दैनंदिन आरोग्यविषयक बाबी अधिक सहजपणे समजून घेता आल्या.

 

दवाखाना कर्मचाऱ्यांनी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे प्रत्यक्ष नमुने आकर्षक व माहितीपूर्ण पद्धतीने मांडून शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनातून पौष्टिक व संतुलित आहाराची निवड, आवश्यक पोषक घटकांचे महत्त्व तसेच टाळावयाचे अथवा मर्यादित प्रमाणात सेवन करावयाचे पदार्थ याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच “सुदृढ महिला, निरोगी कुटुंब” या संकल्पनेला बळ देणारा व माहितीपूर्ण मार्गदर्शन, दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर आणि पौष्टिक आहाराच्या प्रत्यक्ष प्रदर्शनामुळे कार्यक्रम विशेष उपयुक्त असल्याचे महिलांनी सांगितले.

 

यावेळी डॉ. जमादार यांनी १३ ऑक्टोबर रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व १५ ऑक्टोबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments