Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorized*‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग*

*‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत सासवड नगर परिषदेचा विविधांगी उपक्रमांना वेग*

 

 

*स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृतीसह नागरिकाभिमुख सेवा देण्यावर भर*

 

पुणे, दि.४ : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ तसेच १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सासवड नगर परिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न ठेवता नागरिकाभिमुख सेवा तातडीने व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यावरही नगर परिषदेने भर देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली.

 

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि लोकसेवा यांचा समन्वय साधत ‘स्वच्छ, सुंदर, हरित आणि सक्षम सासवड’ घडविण्याच्या दिशेने सासवड नगर परिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मालमत्ता हस्तांतरण, नवीन नळ जोडणी, जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र, कर आकारणी, बांधकाम परवाना, झोन दाखला, बचत गट नोंदणी, ना-हरकत प्रमाणपत्र, ८-अ उतारा आदी विविध दाखले व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

 

अभियानाच्या अनुषंगाने शहरातील ६ महत्त्वाच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ व सुंदर सासवडच्या संकल्पनेला बळ देत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

 

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामीण रुग्णालय, सासवड यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ शहराच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला या उपक्रमातून विशेष प्राधान्य देण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची भावना आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न या अभियानांतर्गत करण्यात आला.

 

याशिवाय सासवड शहरातील बाजारपेठ परिसर आणि व्यापाऱ्यांमध्ये ‘प्लास्टिकमुक्ती अभियान’ राबविण्यात आले. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन नागरिक व व्यापाऱ्यांना करण्यात आले.

कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंगबाबत जनजागृती आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याबरोबरच घरच्या घरी कंपोस्टिंग करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले, असेही श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments