पुणे : आई तुझ्या ग चरणी… आई गोंधळाला ये… च्या तालावर पुणेकरांनी माता माता की जय… चा गजर केला. श्री महालक्ष्मी मंदिरासमोर भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टीत अष्टलक्ष्मी भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो देवीभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. यावेळी मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. अशाप्रकारे नवरात्रात पहिल्यांदाच मंगळवारच्या औचित्यपूर्ण महत्त्व लक्षात घेऊन अशी वैविध्यपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात अष्टलक्ष्मी भव्य रथयात्रा सोहळा यापूर्वी झालेला नव्हता. त्यामुळे यंदा मंदिरातर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला. मंदिरासमोर पुष्पवृष्टी करून या रथयात्रा सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विश्वकर्मा विद्यापीठातील पदाधिकारी, मंदिराचे कार्यकर्ते व राजेश अंबिके, शेखर निवंगुणे यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. मंदिरा बाहेर दररोज सायंकाळी ७.३० वाजता गंगा आरती आयोजन करण्यात येत असून याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.


