*लवकर निदान, प्रभावी उपचार आणि निरोगी समाजाच्या दिशेने आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल!*
पुणे, दि.१४: कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि संभाव्य रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, या उद्देशाने इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा येथे कर्करोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २४४ लाभार्थ्यांची तपासणी व स्क्रीनिंग करण्यात आले.
या शिबिरामध्ये तोंडाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या तीन प्रमुख प्रकारांच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला. कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता.
हे शिबिर पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक, डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे, डॉ. अंबादास देवमाने; जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, डॉ. रामचंद्र हांकारे; अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे, डॉ. भाग्यश्री पाटील; निवासी वैद्यकीय अधिकारी, पुणे, डॉ. वंदना जोशी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे, डॉ. वसावे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. उत्कृष्ट नियोजन, प्रभावी समन्वय, सेवाभावी वृत्ती आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर हा आरोग्यविषयक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर निदान हीच प्रभावी शस्त्रे आहेत. नागरिकांनी आरोग्यविषयक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घ्यावी आणि आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
“लवकर निदान, प्रभावी उपचार, निरोगी समाज” हे ध्येय समोर ठेवून कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. बावडा येथे आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सार्वजनिक आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
०००


