Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorized*रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित* ...

*रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित* *जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची कारवाई; दोन विक्रेत्यांना सक्त ताकीद*

 

 

पुणे, दि. १४ : रब्बी हंगाम २०२६ मध्ये निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी पुणे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या. या तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळलेल्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, चार विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच दोन विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

 

कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीदरम्यान विक्री परवान्यातील साठा नोंदवहीनुसार शिल्लक असलेला खतसाठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा यामध्ये तफावत असणे, विक्री परवान्यात समाविष्ट नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करणे, जादा दराने खत विक्री करणे, नोंदणी प्रमाणपत्राचे विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, परवाना ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी न लावणे, खत विक्रीचा मासिक प्रगती अहवाल परवाना अधिकाऱ्यांना सादर न करणे आणि मुदतबाह्य निविष्ठा विक्रीसाठी ठेवणे, अशा त्रुटी आढळून आल्या.

 

या अनियमिततांमुळे संबंधित खत विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य दर्जाची खते, रास्त दरात आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागामार्फत तपासणी व गुणवत्ता नियंत्रणाची मोहीम राबविण्यात येत आहे. खत विक्रेत्यांनी विक्री परवान्यातील अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे. साठा नोंदवही अद्ययावत ठेवावी, दरपत्रक व उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावावी आणि शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments