Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा – अतिरिक्त आयुक्त...

मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

विभागनिहाय नियोजन, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि नियमित आढावा घेण्याचे दिले निर्देश

 

 

 

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : चालू आर्थिक वर्षातील कर वसुलीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे करसंकलन व कर आकारणी विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीत मालमत्ता कराची थकबाकी, मालमत्ता जप्तीची कारवाई, मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे, सारथी पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी तसेच मागील बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

 

 

बैठकीस कर संकलन व कर आकारणी विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, प्रशासन अधिकारी रश्मी देशपांडे, सहाय्यक मंडल अधिकारी बाळू लोंढे, हनुमंत सरवदे, मनोज शिंदे, अजित नखाते, रणजीत भोसले, जयंत मरळीकर, राजेश बांदल, रविंद्र शिंदे, राजेंद्र कुदळे, प्रसाद एच. एस, राकेश सौदे, अतुल काळे, नाना सोनटके, खुकाळे एस, निता राणे, डी. डी. गोरडे, हनुमंत मोरे, मिलिंद कांबळे तसेच कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे काम करावे. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मालमत्ता कराच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असतो. या उत्पन्नाच्या आधारे विविध विकासकामे आणि नागरी सुविधांसाठी आर्थिक नियोजन करण्यात येते. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व सहाय्यक मंडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध करवसुली मोहीम राबवून निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. करवसुलीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सांडभोर यांनी दिला.

 

 

 

मालमत्ता कर वसुली वाढविण्यासाठी प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजनांचे नियोजन करावे. करवसुलीची आकडेवारी वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबतची लेखी माहिती सादर करावी. तसेच संपूर्ण करवसुली प्रक्रियेवर आयुक्तांचे बारकाईने लक्ष असून, सर्वांनी आपापली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

तसेच मागील पाच वर्षांतील मालमत्ता कर संकलनाच्या आकडेवारीची तुलना करून चालू वर्षातील करवसुलीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा करवसुलीत अपेक्षित वाढ होणे आवश्यक असून करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे.

 

 

 

करवसुली करताना ज्या मालमत्तांकडून थकीत कराची वसुली तुलनेने लवकर होऊ शकते, अशा मालमत्तांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे. थकबाकीदारांना त्यांच्या थकीत कराबाबत वारंवार अवगत करावे. आवश्यक नोटिसा बजावूनही कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार जप्तीची कारवाई करावी. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करताना कोणतीही दिरंगाई करू नये.

 

 

 

याशिवाय, महानगरपालिकेच्या नवीन मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत कर आकारणीच्या प्रक्रियेत असलेल्या मालमत्तांना प्राधान्य देऊन संबंधित कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. तसेच निवासी, बिगरनिवासी, मिश्र वापराच्या मालमत्ता, औद्योगिक मालमत्ता आणि मोकळ्या जमिनी यांसह विविध प्रकारच्या मालमत्तांची माहिती अद्ययावत ठेवावी. याव्यतिरिक्त, मालमत्ता कराशी संबंधित प्रलंबित असलेल्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा करावा. मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे आणि अन्य प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. करवसुलीच्या कामाचा नियमित आढावा घेऊन अडचणी दूर कराव्यात. यापुढे दर पंधरा दिवसांनी करवसुलीचा आढावा घेण्यात येणार असून, त्यानुसार कामकाजातील प्रगती तपासली जाईल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments