पुणे, दि. १८ (जिमाका) : अंध व दुर्बल मतदारांना मतदानाचा हक्क सहजपणे बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत अंध व दुर्बल मतदारांना मतदानासाठी आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी निवडणूक संचालन नियम, १९६१ मधील नियम ४०(अ) नुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदान कक्षात प्रवेश करताना मतदारांसोबत कोणत्याही प्रकारची व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, मतदानासाठी सहायकाची आवश्यकता असल्यास संबंधित मतदाराने मतदानाच्या किमान तीन दिवस आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देणे आवश्यक आहे.
अंध व दुर्बल मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपली अडचण जाहीर करून विहित नमुन्यात घोषणापत्र सादर करावे. त्यानंतर पीठासीन अधिकारी नियमानुसार पुढील कार्यवाही करतील. सहाय्यकाच्या मदतीने मतदान झाल्यास त्याची नोंद नमुना १४-अ मध्ये ठेवणे बंधनकारक असेल. तसेच, या नोंदींची छाननी करून आवश्यक कागदपत्रे संबंधित निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे. अंध व दुर्बल मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षणात अंध व दुर्बल घटकांच्या मतदानासंबंधी सर्व बाबी स्पष्टपणे समजावून सांगाव्यात. सर्व मतदान केंद्रांना विहित नमुन्यातील घोषणापत्र नमुने व नमुना १४(ए) पुरेशा प्रमाणात पुरवावेत, साथीदार सुविधेसाठी आगाऊप्राप्त अर्जाची यादी व प्राप्त मतदारांची माहिती केंद्रनिहाय संबंधित केंद्राध्यक्षांना द्यावी, मतदानानंतर नमुना १४(ए) संकलित करून निरीक्षकांच्या छाननीसाठी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
००००


