पुणे : रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, नाडी, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा यांसारख्या तपासण्या नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात करण्यात आलया तब्बल ३५० महिलांच्या विविध तपासणी करण्यात आल्या. सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग व हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबीर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच आरोग्याचा जागर देखील व्हावा, याकरिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबातील महिला आरोग्य दृष्टया सक्षम आणि साक्षर असेल, तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते. आजच्या धकाधकीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिबीरात संपूर्ण सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी१२ या रक्ततपासण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय महिलांसाठी मॅमोग्राफी, हाडांच्या घनतेची तपासणी देखील करण्यात आली. तसेच मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ५० हून अधिक जणांनी रक्तदान करीत सहभाग घेतला. आरोग्य शिबीराच्या नोंदणी व अधिक माहितीसाठी ७५१७५६९९२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


