पुणे, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींसाठी रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उद्दिष्ट निश्चित केलेल्या असाक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली असून, या चाचणीच्या माध्यमातून त्यांचे साक्षरता व संख्याज्ञानाचे मूल्यमापन केले जाणार आहे.
ही परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. परीक्षार्थींनी निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तासांचा कालावधी मिळणार आहे. प्रश्नपत्रिकेत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या तीन विषयांचा समावेश असून, प्रत्येक विषयासाठी ५० गुण याप्रमाणे एकूण १५० गुणांची परीक्षा असेल.
परीक्षार्थींनी आपल्या परिसरातील शाळेचा यू-डायस क्रमांक असलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षेचे स्वरूप ऑफलाइन असून, परीक्षार्थींनी प्रश्नपत्रिका काळ्या किंवा निळ्या शाईच्या लेखणीने सोडवावी. परीक्षेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यांसारख्या उपलब्ध ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
ज्या असाक्षर व्यक्तींची उल्लास संकेतस्थळावर पूर्वनोंदणी झालेली नाही, त्यांनाही परीक्षेच्या दिवशी केंद्रावर नोंदणी करून परीक्षेत सहभागी होता येणार आहे.
या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र व गुणपत्रक दिले जाणार आहे. यामुळे त्यांना पुढील शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील कमाल असाक्षर व्यक्तींना या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
००००


