पुणे, २४ ऑक्टोबर २०२६ : जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे यांच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी समर्पित असलेल्या “वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” या संस्थेस यंदाचा ‘जनसेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
धनादेश स्वरूपात रक्कम रु.१,०१,०००/- ( एक लाख एक हजार रुपये), सन्मान चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जनसेवा सहकारी बँकेचे सेवक श्री दत्तात्रय गाडे, श्री संतोष शिंदे आणि सौ आरती हगवणे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘गुणवंत सेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात झालेल्या या वर्धापन दिन समारंभास मा. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष रवि तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, ”वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ मा. डॉ.श्री.नंदकुमार मुलमुले व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ” सहकाराच्या एकूण परंपरेमध्ये १९७२ मध्ये हडपसरमध्ये सुरू झालेली जनसेवा सहकारी बँक ही आज पुण्यातील विश्वासाची बँक बनली आहे. याचा प्रत्येक पुणेकराला अभिमान आहे . कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपण समाजाचं देणं लागतो ही भावना ठेवावी आणि समाजाला संघटित करून प्रश्न सोडवावेत ही संघाची मूलभूत शिकवण आहे. संघ विचार घेऊन अनेक कार्यकर्ते समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये पोहोचले आणि त्यातूनच संघाच्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांमागे नफ्यापेक्षा समाजसेवेची भावना होती म्हणूनच त्यांना समाजाचा विश्वास मिळाला. अशा संस्थांपैकी एक जनसेवा सहकारी बँक ही संस्था आहे.”
” कुठलीही सहकारी संस्था इतका काळ चालवायची असेल ती टिकवून ठेवायची असेल तर त्याला विश्वासार्हता महत्त्वाची असते. सहकारामध्ये विश्वासार्हता असेल तर ती संस्था कधीही बंद पडत नाही. ती संस्था कायम यशाची शिखरे पादाक्रांत करते. जनसेवा बँकेची गेल्या ५४ वर्षांची वाटचाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ,” अशा शब्दांत श्री मोहोळ यांनी बँकेच्या कार्याचा गौरव केला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना ”वृक्षदाई प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू” संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी मोरे म्हणाले की, ” पुण्याचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. हा क्षण आमच्यासाठी सन्माना बरोबरच मांगल्य आणि पावित्र्याचा सुवर्णक्षण आहे. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक सन्मानचिन्ह नसून, भविष्यातील कार्यासाठी आम्हांला नवी ऊर्जा देणारी प्रेरणा आहे. हा पुरस्कार एकट्या वृक्षदाई प्रतिष्ठानचा नसून, ज्या हजारो हातांनी आमच्यासोबत अहोरात्र कष्ट करून ही झाडे लावली, या वृक्षांचे संगोपन केले, त्यांना पाणी दिले आणि त्यांचे जतन केले, त्या सर्व हातांचा आणि कार्यकर्त्यांचा हा बहुमान आहे. जनसेवा सहकारी बँकेने आमच्या ‘वृक्षदायी प्रतिष्ठान’च्या कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला आहे, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने बँकेचे मनापासून आभार व्यक्त करतो.”
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मानसोपचारतज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी ओघवत्या भाषेत सर्वसामान्यांच्या जीवनातील उदाहरणे देत उपस्थितांना “सुखाचा शोध ” या विषयावर मार्गदर्शन केले.
“प्रत्येक व्यक्ती यश, सुख, आनंद , समाधान अशा चार प्रकारच्या अवस्थांतून जातो. आयुष्यात तुलना कधी करू नये आपण नेहमी तुलना करून यशाची मांडणी करीत असतो. स्पर्धा हि नेहमी निकोप असावी. आयुष्याला अर्थपूर्णता तेव्हाच येते, जेव्हा आपण निरपेक्ष वृत्तीने लोकांसाठी काहीतरी कार्य करतो आणि त्यातूनच खरा आनंद मिळतो,” असा संदेश मुलमुले यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष पोळेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच बँकेचे अध्यक्ष डॉ. हिरेमठ यांनी बँकेच्या वर्षभरातील आर्थिक कामगिरीवर प्रकाश टाकला.श्री. सुहास शामगावकर यांनी स्वागत गीत सादर केले. श्री. अभिजित केळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सौ. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.
जनसेवा सहकारी बँकेने २४ ऑक्टोबर १९९८ पासून सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, सेवाभावी तसेच विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या संस्थांना ‘जनसेवा पुरस्कार’ देण्याची परंपरा सुरू केली आहे. समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागील उद्देश आहे
.


