चिंचवड/सांगवी(प्रतिनिधी) दि. २५ ऑक्टोबर २०२६:- सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प काढून टाकण्यात आल्याच्या आणि स्मारकाच्या चौथऱ्याची मोडतोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज (दि.२५) चौथा दिवस असून संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत बसवावे, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. राज्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी पती संतोष कांबळे यांच्यावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा त्याचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी बनसोडे म्हणाले की, सांगवीतील संविधान चौकामध्ये असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची कथितरीत्या बेकायदेशीरपणे मोडतोड करून ते काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे केवळ निषेध व्यक्त करून थांबणे पुरेसे नसून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणे आणि प्रास्ताविकेचे शिल्प पूर्वीप्रमाणे सन्मानपूर्वक पुन्हा बसवणे आवश्यक आहे.संविधानाची प्रास्ताविका ही हजारो-लाखो नागरिकांच्या सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या शिल्पाची पुनर्स्थापना ही आंदोलनाची सर्वांत महत्त्वाची मागणी आहे.संबंधित नगरसेविका, त्यांचे पती आणि या कृत्यात सहभागी असलेल्या इतरांवर गुन्हे दाखल व्हावेत.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले असले, तरी लावण्यात आलेली कलमे या घटनेच्या गांभीर्याच्या तुलनेत अपुरी आहेत पोलिसांकडून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमांचा उल्लेख करण्यात आला असून, या प्रकरणात कलम 324 3(1), 302, 299, 197, 196 यांसारख्या तरतुदींच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजेत.या घटनेकडे केवळ किरकोळ स्वरूपाची तोडफोड म्हणून पाहता कामा नये. घटनेचे स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे योग्य ती कारवाई झाली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.महानगरपालिकेने १५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या प्रकरणाची माहिती दिली असून प्रशासन आणि पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून पुढील कार्यवाही करावी असे मत ही बनसोडे यांनी व्यक्त केले.
सांगवी परिसरातील इतर चौकांमध्ये विविध महापुरुषांच्या आणि देवतांच्या मूर्ती असताना केवळ संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्पच का हटविण्यात आले.या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत, संविधानाच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न झाला का, अशी शंका असून या संदर्भातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे.काही जण या आंदोलनाला राजकीय स्वरूप देत आहेत.भारतीय संविधान हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा समाजाचा विषय नसून तो सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा आधार आहे. संविधानामुळे नागरिकांना सन्मानाने जगण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला आहे.त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केवळ पक्षीय राजकारणाच्या चौकटीत पाहणे चुकीचे असून संविधानाचा सन्मान राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी मांडली.
स्थानिक सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून योग्य ती भूमिका घ्यावी.काही व्यक्तींना आंदोलनस्थळी पाठवून, समाजमाध्यमांवर रील तयार करून किंवा वादग्रस्त वक्तव्ये करून आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होत आहे.अशा प्रकारांमुळे मूळ प्रश्न बाजूला पडू नये. संबंधित नगरसेविका आणि त्यांच्या पतीने या घटनेबद्दल चूक झाल्याची कबुली देऊन पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची माफी मागावी. स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी संबंधितांना समज देण्यात आल्याचे सांगितले.मात्र, केवळ समज देणे पुरेसे नसून प्रत्यक्षात शिल्पाची पुनर्स्थापना आणि योग्य कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कांबळे यांनी केली.
आंदोलनाला काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, मारुती भापकर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रांत अध्यक्ष शांताराम खुडे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, आपचे शशी बावनकर, पथारी संघटनेच्या नेत्या गौरी शेलार, काँग्रेस पदाधिकारी हरीश डोळस, देवदत्त रानवडे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, नबीलाल मुल्ला, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, विल्यम साळवी, रवींद्र भोसकर, आप्पा शिंदे, आलोक लाड आदी उपस्थि
त होते.


