Monday, October 26, 2026
Google search engine
HomeUncategorized*तुळजाभवानी मातेचरणी पुण्यातील आर आर किराड परिवाराची पुष्पआरास सेवा* आर. आर....

*तुळजाभवानी मातेचरणी पुण्यातील आर आर किराड परिवाराची पुष्पआरास सेवा* आर. आर. किराड समूहाची सलग अकराव्या वर्षी भक्तीसेवा

 

 

पुणे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त यंदा साकारण्यात आलेली भव्य पुष्पआरास पुणे येथील तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त असलेल्या आर. आर. किराड समूहाच्या वतीने अर्पण करण्यात आली आहे. समूहाच्या वतीने सलग अकराव्या वर्षी मातेच्या चरणी ही विशेष सजावटसेवा अर्पण करण्यात आली.

 

पुण्यातील सरपाले पुष्पव्यापारी यांच्या माध्यमातून ही आरास साकारण्यात आली आहे. फुलांसोबतच मातेच्या शृंगारातील पवित्र आणि मंगल प्रतीक असलेल्या बांगड्यांचा कलात्मक वापर तसेच विविध शुभार्थ दर्शविणाऱ्या हस्तमुद्रांची आकर्षक मांडणी, हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्ट्य आहे.

 

यंदाच्या पुष्पआरासेला ‘आदि पराशक्ती’ हा विशेष आध्यात्मिक भावार्थ देण्यात आला आहे. ‘आदि पराशक्ती’ म्हणजे समस्त शक्तींचे मूळ असलेली, सर्वोच्च, अनंत आणि विश्वाला चेतना प्रदान करणारी परम दिव्य मातृशक्ती. सृष्टीच्या निर्मितीपासून ते तिच्या संचालनापर्यंत सर्वत्र कार्यरत असलेल्या आदिशक्तीचे महात्म्य या आरासेच्या माध्यमातून कलात्मक आणि भक्तिमय स्वरूपात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

आरासेतील आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे विविध हस्तमुद्रांची कलात्मक मांडणी. प्रत्येक हस्तमुद्रा विशिष्ट भाव, शुभसंकल्पना आणि आध्यात्मिक अर्थ व्यक्त करते. फुले, बांगड्या आणि हस्तमुद्रा यांचा कल्पक संगम या सजावटीला एक आगळेवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्रदान करतो.

 

आर. आर. किराड समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश किराड म्हणाले, आदि पराशक्ती म्हणजे जिच्यापासून सर्व शक्तींचा उगम होतो आणि जिच्या शक्तीने संपूर्ण विश्व कार्यरत राहते, अशी परम दिव्य मातृशक्ती. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनातून आम्हाला ऊर्जा, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळते. मातेच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची बाब आहे.

 

यंदा सलग अकराव्या वर्षी ही सेवा अर्पण करताना आम्ही ‘आदि पराशक्ती’ या संकल्पनेतून मातेच्या अनंत शक्तीचे महात्म्य व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाची ही सेवा आम्ही दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित करीत आहोत. मातेच्या कृपेने राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेला सुख, समृद्धी व सुजलाम-सुफलाम भवितव्य लाभो, ही प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments