आळंदी, पुणे दि.२९ : “वारकरी सांप्रदाय संतांच्या विचारांचा वारसा जपणारा ज्ञान समृद्ध सांप्रदाय आहे. हा सांप्रदाय समता, बंधुभाव आणि शिस्तीची जगातील सर्वांत मोठी परंपरा जपतो. त्यामुळे कीर्तनातून संत विचारांचे शुद्धपणे प्रबोधन होणे गरजेचे आहे.” असे विचार जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १०० व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आळंदीतील १७ व्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यावेळी ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
६९ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व माईर्स विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मसापचे कोशाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बबनराव कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका पूजा घुंडरे आणि माईर्स एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड – चाटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. उल्हासदादा पवार म्हणाले,”भाषा ही संस्कृतीची खरी वाहक आहे, आपली अभिजात लोकसंस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा जोपासली पाहिजे. आज समाजात वितंडवाद नव्हे तर संतांच्या साहित्यावर सुसंवाद आणि परिसंवाद घडावा.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” संतत्वाची साथ सोडल्यामुळेच समाजाचे नैतिक अधःपतन झाले आहे; दांभिकता आणि अंधश्रद्धा बाजूला सारून सर्वांनी संतांच्या विचारांचा एकात्म महाराष्ट्र घडवावा. संत परंपरेतून विश्वशांतीचा ध्यास घेणारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे खरे पाईक आहेत.
उषाताई मंगेशकर म्हणाल्या,”संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिके’तील ओव्यांना हृदयनाथजींनी संगीताचा साज चढवला आणि लतादीदींनी आपल्या स्वराने घराघरांत पोहोचवल्या. माउलींच्या या पावन भूमीत डॉ. कराड यांनी निस्वार्थ भावनेतून केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
प्रा. स्वाती कराड – चाटे म्हणाल्या,” मराठी भाषेचे संवर्धन करणे, पुढच्या पिढीला तिची ओळख करून देणे ही शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. चांगल्या साहित्यातूनच समाज समृद्ध होतो. म्हणून मुलांमध्ये संत साहित्याचा विचार रुजवावा. नांदी संमेलनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माउलींच्या पावन भूमीत ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे’ होणारी ही वाटचाल मराठी भाषेला अधिक बळकटी देईल.”
याप्रसंगी मसापचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि कार्यवाह सुनील महाजन यांनी पुण्यात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आळंदीतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.
विशेष चौकट (कोट) :
“आज जग अशांततेच्या उंबरठ्यावर असताना संतांच्या तत्त्वज्ञानाची गरज पूर्वीपेक्षा अधिक भासत आहे. केवळ भौतिक विज्ञानाने मानवाला शांती, सुख आणि समाधान लाभू शकत नाही. विज्ञान आणि अध्यात्म जेव्हा एकत्र येईल, तेव्हाच जगात खरी शांतता प्रस्थापित होईल आणि मानवाचे कल्याण होईल.”
विश्वधर्मी. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
संस्थापक, अध्यक्ष माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे.


