पुणे : फुलांनी सजविलेल्या पालखीतून श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पादुकांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मंडई परिसरातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठ तर्फे या नगरप्रदक्षिणा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये स्वामींच्या मूर्तीला पोशाख, दागिने आणि गाभा-यात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली.
मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, बुधवार पेठच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामी प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष गजानन जेधे, कोषाध्यक्ष संदीप होनराव, विश्वस्त रविंद्र शेडगे, विक्रम आगाशे, श्रीराम पुरंदरे, डॉ.अमित वाडदेकर यांसह कार्यकर्ते व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
कमलेश कामठे म्हणाले, स्वामी प्रकटदिनानिमित्त बुधवारी पहाटे ३ वाजता श्रीं चा लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांचे प्रकटदिनाचे कीर्तन झाले. श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान, रामेश्वर चौक, शनिपार, निंबाळकर तालीम, खुन्या मुरलीधर मंदिर, चित्रशाळा चौक, मोदी गणपती, ओंकारेश्वर, शनिवारवाडा, देसाई महाविद्यालय, छत्रपती शिवाजी रस्ता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, दत्तमंदिर मार्गे श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थान येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यामध्ये भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.


