Tuesday, November 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉमिक कॉन इंडिया पुणे एडिशन चे ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी...

कॉमिक कॉन इंडिया पुणे एडिशन चे ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी आयोजन

 

पॉप कल्चरच्या विविध अनुभवांनी रंगणार वीकेंड; शहरातील फॅन्डम समुदायाला पुन्हा एकत्र येण्याची संधी

 

पुणे, २ नोव्हेंबर २०२६ : मारुती सुझुकी प्रस्तुत आणि क्रंचिरोलच्या सहयोगाने ‘पुणे कॉमिक कॉन’ येत्या ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७ रोजी पुण्यातील मेस्से ग्लोबल लक्ष्मी लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे. पॉप कल्चरच्या विविध पैलूंचा अनुभव देणारा हा दोन दिवसांचा महोत्सव मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरणार आहे.

 

गेल्या काही वर्षांत पुणे हे मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. विद्यार्थी, तरुण आयटी व्यावसायिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम पुण्यात पाहायला मिळतो. कला, संगीत आणि साहित्याविषयीची शहराची खोलवर रुजलेली आवड तसेच आधुनिक मनोरंजनाच्या नव्या प्रकारांबद्दल वाढत असलेला उत्साह यामुळे कॉमिक कॉन आणि पॉप कल्चरच्या वाढत्या चाहता वर्गासाठी पुणे हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे.

 

कॉमिक कॉन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शेफाली जॉन्सन म्हणाल्या, “शनिवार पेठेतील ऐतिहासिक रस्ते, डेक्कन सारखे सांस्कृतिक केंद्र, गजबजलेला एफ. सी. रोड तसेच औंध आणि विमाननगर मधील सर्जनशील वातावरण अशा विविध वैशिष्ट्यांमुळे पुण्याचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. मराठी रंगभूमी, साहित्य, चित्रपट आणि कलेविषयीचे शहराचे प्रेम त्याच्या सांस्कृतिक ओळखीची साक्ष देते. ही ओळख परंपरेशी घट्ट जोडलेली असतानाच सातत्याने विकसितही होत आहे. स्थानिक संस्कृती आणि जागतिक प्रभावांचा हा अनोखा संगम पुण्याला कॉमिक कॉनसाठी एक उत्तम ठिकाण बनवतो. सर्जनशीलता, स्वतःची अभिव्यक्ती आणि पॉप कल्चरविषयीच्या आवडीचा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील चाहत्यांना एकत्र आणणाऱ्या या वीकेंडची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

 

नॉडविन गेमिंगचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, “शनिवारवाड्याचा ऐतिहासिक वारसा ते कोरेगाव पार्कमधील गजबजलेली कॅफे संस्कृती, अशा अनेक वैशिष्ट्यांनी पुणे शहर समृद्ध आहे. येथील तरुणाईला गेमिंग, संगीत आणि लोकांना एकत्र आणणाऱ्या विविध अनुभवांची विशेष आवड आहे. एनएच७ वीकेंडरचा वारसा असो किंवा वाढता गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स समुदाय, समान आवडीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणण्याची पुण्याची नेहमीच खास ओळख राहिली आहे. मिसळपाव आणि बाकरवडीप्रमाणेच शहरातील लोकांच्या आपल्या आवडीनिवडींवरील प्रेमही तितकेच खोलवर रुजलेले आहे. कॉमिक कॉनच्या माध्यमातून या सर्व आवडींना एकाच छताखाली आणले जाते. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कथांचा आनंद घेता येतो, नवे विश्व अनुभवता येते आणि समान आवड असलेल्या लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळते.”

 

गेल्या काही वर्षांत पुण्यात कॉस्प्ले या कलाप्रकाराला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांना वेशभूषा, सर्जनशीलता आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्याची कला तरुण चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. नवोदित तसेच अनुभवी कॉस्प्ले कलाकारांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती करण्यासाठी आणि समान आवड असलेल्या चाहत्यांकडून कौतुक मिळवण्यासाठी कॉमिक कॉन हे एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. यंदाच्या आयोजनात आकर्षक वेशभूषा, विविध व्यक्तिरेखांचे सादरीकरण आणि इतर कॉस्प्ले कलाकारांशी संवाद साधण्याच्या संधी चाहत्यांना अनुभवता येतील.

 

नॉडविन गेमिंगची उपकंपनी असलेल्या कॉमिक कॉनच्या या आयोजनात विविध संग्रहणीय वस्तू, विशेष स्वरूपातील उत्पादने तसेच स्वतंत्र कलाकार आणि निर्मात्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे नवे संग्रह पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना अनेक आकर्षक गोष्टी अनुभवण्यासोबतच खरेदी करून घरी घेऊन जाण्याचीही संधी मिळणार आहे.

 

कॉमिक कॉनच्या मागील पर्वाला २५ हजारांहून अधिक चाहत्यांनी भेट दिली होती. ब्लॉकबस्टर चित्रपटांवर आधारित आकर्षक मांडणी, अ‍ॅनिमेचे विशेष अनुभव, रेसिंग सिम्युलेटर्स आणि गेमिंग झोन्स अशा विविध उपक्रमांनी हा महोत्सव रंगला होता. यंदा चाहत्यांसाठी आणखी अनेक आकर्षणे असणार आहेत. विशेष गेमिंग आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) झोन्स, ब्रँड्सचे परस्परसंवादी अनुभव, कंटेंट क्रिएटर्सशी संवाद, लाइव्ह संगीताचे कार्यक्रम, स्टँडअप कॉमेडी आणि अन्य मनोरंजनात्मक उपक्रमांचा यात समावेश असेल. त्यामुळे सर्व वयोगटांतील चाहत्यांसाठी हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला ठरणार आहे.

 

कार्यक्रमाची माहिती

 

पुणे कॉमिक कॉन २०२७

तारीख : ६ आणि ७ फेब्रुवारी २०२७

स्थळ : मेस्से ग्लोबल लक्ष्मी लॉन्स, मुंढवा, पुणे

वेळ : सकाळी ११ वाजल्यापासून

वेबसाइट : www.comicconindia.com

तिकिटांसाठी लिंक : https://bit.ly/4jVGBjz

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments