पुणे : जगातील बदलती युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारतात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी कंपन्यांचाही सहभाग वाढत असून, शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश ते निर्यातदार देश अशी भारताची वाटचाल सुरू आहे. लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक शक्ती या दोन्हींच्या बळावर भारत अधिक सक्षम होत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची क्षमता संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर डॉ. श्रीनिवास अंबिके यांनी केले.
स्नेह-सेवा व मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ‘सैनिक-स्नेह’ या प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त देशाच्या सीमावर्ती भागातील जवानांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला. नवी पेठेतील निवारा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला चितळे बंधु मिठाईवाले उद्योग समुहाचे श्रीकृष्ण चितळे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद भडकमकर, सचिव रवींद्र कोठावदे व प्रकल्प प्रमुख डॉ. दिनेश पांडे तसेच संस्थेचे सभासद, काही देणगीदार व शिक्षक आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी चितळे बंधू उद्योग समूहाचे प्रमुख श्री श्रीकृष्ण चितळे यांनी सहकार्य केले.
डॉ. श्रीनिवास अंबिके पुढे म्हणाले, भारताच्या शेजारील काही देशांमध्ये अस्थिरता आणि अराजकतेचे वातावरण असले तरी भारतीय सैन्य दल सक्षम आणि सतर्क आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल वर्षभर प्रशिक्षणाच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. त्यांनी सैन्य शक्ती व आर्थिक शक्ती या हातात हात घालून चालल्या पाहिजेत असे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितले होते. त्याच दिशेने भारताची वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद भडकमकर म्हणाले, उपक्रमाचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. संस्थेच्या वतीने तब्बल ६५ हजार फराळाचे बॉक्सेस सीमेवरील जवानांना पाठवले आहेत. दरवर्षी खडकी येथील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट तसेच पॅराप्लेजिक सेंटर येथील जवानांनाही मिठाई बॉक्सेस देतो. स्नेहसेवा व मैत्रेय संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबवले जातात.
संस्थेचे ज्येष्ठ सदस्य कुमार बडवे यांनी सैनिक स्नेह प्रकल्प कसा सुरू झाला व त्याची आतापर्यंतची वाटचाल याच्या काही आठवणी सांगितल्या. प्रकल्प प्रमुख डॉ. दिनेश पांडे यांनी थोडक्यात सैनिक स्नेह कार्यक्रमाचा आढावा घेतला. ते म्हणाले कारगिल, दिब्रुगड, तवांग, बागडोगरा आणि धर्मशाला या सीमांवरील एकूण ११ बटालियन ना मिठाई पाठवली. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली दिवाळी भेटकार्डे देखील पाठवली. कार्यक्रमात आलेल्या विविध बटालियनच्या जवानांना पाहुण्यांच्या हस्ते मिठाई व शाळकरी मुलांनी बनवलेली भेट कार्डे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा यादी यांनी केले. शेवटी रवींद्र कोठावदे यांनी आभार मानले.


