*कपडे, शूज आणि बॅगच्या प्रीमियम स्वच्छता व दुरुस्ती सेवा आता पुण्यात; मार्च २०२७ पर्यंत देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट*
पुणे, ४ नोव्हेंबर २०२६ : कपडे, शूज आणि बॅगची जागतिक दर्जाची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती सेवा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रीमियम ब्रँड ‘प्रेस्टो’ने पुण्यात पदार्पण केले आहे. कल्याणीनगर येथे कंपनीच्या भव्य फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यासह प्रेस्टोने पुण्यात दोन स्टोअर्स सुरू केली असून, दुसरे सेवा केंद्र कोरेगाव पार्क येथे कार्यरत आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रेस्टो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत कासलीवाल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधला.
युरोपमधील कपड्यांची देखभाल आणि स्वच्छता सेवा क्षेत्रातील मोठ्या ब्रँड्सपैकी एक असलेल्या प्रेस्टोला जागतिक स्तरावर ओळख आहे. भारतात गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या ब्रँडने मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये प्रीमियम ड्रायक्लीनिंग व लॉन्ड्री सेवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
कंपनीकडून ड्रायक्लीनिंग, कपडे धुणे, इस्त्री, कपड्यांची दुरुस्ती, शिवणकाम तसेच साड्या, सूट, दैनंदिन वापरातील कपडे आणि लग्नसमारंभातील विशेष पोशाखांची स्वच्छता व देखभाल केली जाते. याशिवाय शूज आणि बॅगची स्वच्छता, दुरुस्ती व पुनर्संचयित करण्याच्या विशेष सेवाही उपलब्ध आहेत. प्रत्येक ऑर्डरसाठी मोफत पिकअप आणि डिलिव्हरीची सुविधा असून, निवडक सेवांसाठी तातडीची सेवाही दिली जाते.
यावेळी बोलताना सुमंत कासलीवाल म्हणाले, “पुणे हे भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक, जागतिक दृष्टिकोन असलेली तरुण पिढी हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. पैठणी साडी असो, आवडते स्नीकर्स असोत किंवा पिढ्यान्पिढ्या जपलेली एखादी मौल्यवान वस्तू असो, पुणेकरांना आपल्या कपड्यांविषयी आणि वस्तूंविषयी विशेष जिव्हाळा आहे. कल्याणीनगरमधील प्रेस्टो फ्लॅगशिप स्टोअरच्या माध्यमातून कपडे, शूज आणि बॅगची स्वच्छता, देखभाल तसेच तज्ज्ञांकडून पुनर्संचयित करण्याच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहोत.”
प्रेस्टोकडून दरवर्षी २० लाखांहून अधिक कपड्यांची स्वच्छता आणि देखभाल केली जाते. यामध्ये एक लाख सूट जॅकेट व ब्लेझर, ५० हजार साड्या आणि १५ हजार लग्नसमारंभातील पोशाखांचा समावेश आहे. याशिवाय दरवर्षी एक लाखांहून अधिक जोड शूज आणि बॅगची स्वच्छता व पुनर्संचयित करण्याचे काम कंपनी करते.
प्रेस्टोची विशेष बाब म्हणजे भारतातील या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीची सर्व स्टोअर्स स्वतःच्या मालकीची असून, ती कंपनीकडूनच चालवली जातात. फ्रँचायझी पद्धतीचा अवलंब न करता प्रत्येक स्टोअरमध्ये समान कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू येथे ग्राहकांना एकसारख्या दर्जाची सेवा मिळते. प्रत्येक कपड्याची स्टोअरमध्ये आल्यानंतर तपासणी केली जाते. डाग काढण्यासाठी विशेष उपकरणे, अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान आणि वाफेचा वापर केला जातो.
भारतीय पारंपरिक कपड्यांच्या देखभालीमध्येही कंपनीने विशेष कौशल्य विकसित केले आहे. पारंपरिक कापड, रंग, नाजूक भरतकाम आणि आकर्षक नक्षीकाम असलेल्या डिझायनर कपड्यांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कपड्याच्या वैशिष्ट्यांनुसार त्याची काळजी घेतली जाते.
“प्रेस्टोची प्रत्येक शाखा कंपनीच्या स्वतःच्या प्रशिक्षित तज्ज्ञांकडून चालवली जाते. कपड्यांची योग्य देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य बाहेरून उपलब्ध करून घेता येत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते. मार्च २०२७ पर्यंत १०० हून अधिक स्टोअर्स सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र, विस्तार करताना सेवेच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे कासलीवाल यांनी स्पष्ट केले.
प्रेस्टोने गुणवत्ता, वेग, सेवा आणि पारदर्शकता या चार प्रमुख तत्त्वांवर आपली सेवा व्यवस्था उभारली आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप स्टोअर्समध्ये ग्राहकांना स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहता येते. कल्याणीनगर येथील स्टोअरमध्येही ग्राहकांना कपडे, शूज आणि बॅगची स्वच्छता व देखभाल कोणत्या प्रक्रियेतून केली जाते, हे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यंदा दर दोन आठवड्यांनी एक नवीन स्टोअर सुरू करण्याचा विक्रम कंपनीने केला आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, बंगळुरू आणि हैदराबाद या नऊ शहरांमध्ये प्रेस्टोची ८० स्टोअर्स कार्यरत आहेत. मार्च २०२७ पर्यंत देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन असून, त्यापैकी आणखी पाच स्टोअर्स पुण्यात सुरू करण्यात येणार आहेत.


