Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorized*"मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर"मध्ये महाभारताचा समावेश*

*”मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर”मध्ये महाभारताचा समावेश*

 

 

पुणे, दि. ६ – युनेस्कोच्या “मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर”मध्ये भांडारकर संस्थेतील महाभारताच्या हस्तलिखिताचा समावेश झालेला आहे. या सूचीत आजवर समाविष्ट झालेल्या भारतातील १७ ग्रंथांपैकी ६ ग्रंथ भांडारकर संस्थेमधील आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी आज येथे दिली.

 

“१५९/१८७५-७६” क्रमांकाचे हे महाभारताचे हस्तलिखित इसवीसनाच्या सोळाव्या शतकातील आहे. ते भूर्जपत्रांवर शारदा लिपीत लिहिलेले असून त्यात ३५८ पाने आहेत. हे हस्तलिखित जॉर्ज ब्यूह्लर या विद्वानाने १८७५ साली काश्मीरमधून प्राप्त केलेले होते. भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीचा मूलाधार म्हणून या हस्तलिखिताचा निर्देश करण्यात येतो.

 

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे संशोधनाधिकारी डॉ. रमेशचंद्र गौर आणि डॉ. मयांक शेखर यांनी हा प्रस्ताव युनेस्कोमध्ये गतवर्षी सादर केला होता. भांडारकर संस्थेतील डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू आणि बाळकृष्ण जोशी यांनी या प्रस्तावाकरिता काम केलेले होते. ऋग्वेद, भगवद्गीता, नाट्यशास्त्र, ध्वन्यालोक आणि पंचतंत्र अशा पाच ग्रंथांचा समावेश युनेस्कोच्या या प्रतिष्ठित सूचीमध्ये यापूर्वीच झालेला आहे अशी माहिती वैशंपायन यांनी दिली. यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन उपस्थित होते.

 

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आज रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीमध्ये महाभारताबरोबरच म्हैसूर येथील कौटिलीय अर्थशास्त्र आणि काश्मिरातील राजतरंगिणीचे हस्तलिखित यांचाही समावेश “मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर”मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments