पुणे,दि.१२: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणींना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज’ (फ्युएल) या संस्थेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) सोशल स्टॉक एक्सचेंजवर (एसएसई) आपल्या दुसऱ्या सामाजिक प्रभाव प्रकल्पाची नोंदणी करत संस्थेने दुष्काळप्रवण भागातील 25 तरुणींच्या दोन वर्षांच्या एमबीए शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी या उपक्रमाद्वारे 50 लाख रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.
राज्यातील दुष्काळी पट्ट्यातून शिक्षणासाठी व रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर, या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या 25 तरुणींपैकी सुमारे 60 टक्के तरुणी या महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातून पुण्यात स्थलांतरित झालेल्या आहेत. तसेच, यातील 68 टक्के तरुणी शेतकरी कुटुंबातील असून, 73 टक्के तरुणी आपल्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. प्रतिकूल आर्थिक आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे या विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण थांबू नये, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
या दुसऱ्या एसएसई इश्यूचे सबस्क्रिप्शन 11 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत खुले राहणार आहे. सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक गुंतवणूकदारांना या शैक्षणिक कार्यात हातभार लावता यावा, यासाठी ‘झिरोधा’ ॲपद्वारेही निधी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निमित्ताने 30 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे विशेष लिस्टिंग सोहळा पार पडणार आहे.
उद्योगजगताशी जोडणारे कौशल्य प्रशिक्षण
केवळ उच्च शिक्षणच नव्हे, तर तरुणांना थेट रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’च्या (जीसीसी) गरजेनुसार 2 हजार तरुणांना अल्पकालीन डिजिटल व तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण देण्याची वचनबद्धताही या उपक्रमात समाविष्ट आहे. यासाठी व्हीएफएस ग्लोबल, सीजीआय, कॅस्ट्रॉल, एसबीआय फाउंडेशन, कॅपजेमिनी यांसारख्या आघाडीच्या कॉर्पोरेट संस्थांचे सहकार्य लाभले आहे. यापूर्वी ‘फ्युएल’ने आपल्या पहिल्या एसएसई इश्यूद्वारे 98.29 लाख रुपये उभारून 40 तरुणींच्या पदवी शिक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती.
कोट
“परिस्थिती नव्हे, तर प्रतिभा हीच तरुणांच्या भविष्याचा निर्णायक घटक ठरावी, हेच आमचे ध्येय आहे. दुसऱ्या सोशल स्टॉक एक्सचेंज लिस्टिंगमुळे दुष्काळग्रस्त आणि दुर्बल घटकांतील 25 तरुणींना त्यांचे एमबीए शिक्षण पूर्ण करता येईल. प्रत्येक लहान योगदानही एखाद्याच्या आयुष्याची दिशा बदलू शकते.”
– डॉ. केतन देशपांडे, अध्यक्ष व कुलगुरू, फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप युनिव्हर्सिटी.


