Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन*

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन*

 

 

**पुणे जिल्ह्यात २ हजार १०३ शेतकऱ्यांचा सहभाग; १ हजार २०८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित**

 

पुणे, दि. 19 : नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

 

पुणे जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपर्यंत २ हजार १०३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला असून, १ हजार २०८.४९३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. मागील रब्बी हंगामात ३ हजार ८६४ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यंदा जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

गहु बागायती, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग, रब्बी कांदा आणि रब्बी मका या अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. पिकानुसार विमा संरक्षित रक्कम व सहभागाची अंतिम मुदत वेगवेगळी असून, ज्वारी (जिरायत) पिकासाठी ३० नोव्हेंबर, तर ज्वारी (बागायत), गहु (बागायत), हरभरा, रब्बी कांदा व रब्बी मका पिकांसाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे.

 

तालुकानिहाय सहभागामध्ये इंदापूर तालुका आघाडीवर असून, येथे ६९९ शेतकऱ्यांनी ४४२.९४९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. पुरंदरमध्ये ४७२ शेतकरी, शिरूरमध्ये ३७५, बारामतीमध्ये ३०८, आंबेगावमध्ये ८८, खेडमध्ये ७०, जुन्नरमध्ये ३५, दौंडमध्ये २३, भोरमध्ये २२ आणि हवेलीमध्ये ११ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, बँक खाते तपशील व जमीन धारणा उतारा आवश्यक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत १०० टक्के नोंदणी बंधनकारक असून, ती पूर्ण नसल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments