पुणे : प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अनुभव नसून, तो माणसाला नवी माणसे, संस्कृती, परंपरा आणि विचारविश्वाशी जोडणारा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बाहेरून प्रवास सुरू असतानाच मनाचा आणि विचारांचाही खरा प्रवास घडत असतो. त्यामुळे प्रवास करताना केवळ पर्यटनस्थळे पाहण्यापेक्षा तेथील माणसे, त्यांची जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या प्रातिनिधिक प्रवासवर्णन लेखसंग्रह ‘प्रवाससरंग’चा प्रकाशन सोहळा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात झाला. या संग्रहाचे संपादन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले आहे. ‘प्रवासरंग’मध्ये मंदार दिवेकर, नितीन दीक्षित, रेखा हिवरेकर, प्रकाश फडके, शितल कोळवणकर, अरविंद कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी, विकास कुलकर्णी, सुधाकर मराठे आणि मेघना ठाकूर या लेखकांच्या लेखाचा सहभाग आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मिलिंद जोशी होते. यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलच्या मनिषा कुतवळ, समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, वल्लरी प्रकाशनच्या सल्लागार मानसी चिटणीस आणि यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, प्रवासाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. परमेश्वराने निर्माण केलेले हे जग डोळे भरून पाहिले पाहिजे. संतांनीही सातत्याने भ्रमण केले. त्यांच्या धर्मकारणाला त्यामुळे देशभक्तीचे स्वरूप प्राप्त झाले. मराठी माणूस अनेकदा स्वतःची चाकोरी सोडण्यास तयार नसतो; मात्र आपल्या मर्यादित विचारविश्वाच्या सीमा ओलांडून प्रवास करणारा माणूस अधिक समृद्ध होतो.
ते पुढे म्हणाले, आज प्रवासवर्णन या वाङ्मयप्रकाराला मोठी मागणी असून, वाचकांना वैविध्यपूर्ण अनुभव जाणून घ्यायचे आहेत. प्रवासात मोबाईलपासून दूर राहून सभोवतालच्या अनुभवांशी एकरूप झाले पाहिजे. स्वतःच्या सवयी आणि आवडी जपण्यापेक्षा त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेतला पाहिजे. प्रवास माणसाला इतरांशी जुळवून घ्यायला शिकवतो. काही वाटा एकट्यानेही चालल्या पाहिजेत. त्यातून माणूस अधिक कणखर होतो. पर्यटनस्थळे आणि गावांचे पावित्र्य जपण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाची आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे.
मनिषा कुतवळ म्हणाल्या, प्रवास म्हणजे केवळ अंतर पार करणे नव्हे, तर विविध अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. आज प्रवास करणे अधिक सोपे झाले असले, तरी प्रत्येक प्रकारच्या प्रवासाचे अनुभव वेगळे असतात. किल्ल्यांचा प्रवास असो किंवा देशविदेशातील भ्रमंती, प्रत्येकातून काहीतरी नवे शिकायला मिळते. प्रवासातील अडचणीही अनुभवाचा महत्त्वाचा भाग असतात. प्रत्येकाने प्रवासाचा असा अनुभव घेतला पाहिजे.
किरण इनामदार म्हणाले, प्रवासवर्णनातून इतरांनाही ती ठिकाणे पाहण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्रात हजारो गावे, साडेतीनशेहून अधिक ऐतिहासिक किल्ले आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. आपण या सर्व ठिकाणी गेले पाहिजे. प्रवास करणे म्हणजे केवळ एका गावातून दुसऱ्या गावात जाणे नव्हे, तर त्या गावांमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे होय.
प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. मानसी चिटणीस यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्योती मनोहर, प्रीती पोथरकर, सार्थक थोरवत, विशाल लोढी यांनी परिश्रम घेतले.
—


