*शेततळ्याच्या आकारमानानुसार ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान; सर्व पात्र अर्जदारांची सोडतीद्वारे निवड*
पुणे, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : पुणे जिल्ह्यात संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व ४ हजार ७२६ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील सोडतीद्वारे ही निवड झाली असून, शेततळ्याच्या आकारमानानुसार लाभार्थ्यांना कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालयाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी अधिक सुलभ होणार आहे.
तालुकानिहाय निवड झालेल्या लाभार्थ्यांमध्ये आंबेगाव ३४७, बारामती ५१८, भोर १३१, दौंड ३८५, हवेली ७३, इंदापूर ८७४, जुन्नर ४६५, खेड ३३६, मावळ ९१, पुणे शहर ८०, मुळशी १, पुरंदर ८२९, शिरूर ५४५ आणि वेल्हे ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपली ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील नोंदणी तपासून घ्यावी. तसेच, योजनेअंतर्गत आवश्यक छाननी पूर्ण होऊन पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेततळ्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. पूर्वसंमतीपूर्वी काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.


