मोहाली येथे आयोजित राष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुण्यातील अलॅक्रिटी स्पोर्ट्स स्कूलच्या (Alacrity Sports School) खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल २१ पदकांची कमाई केली. यामध्ये १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे.
कनिष्ठ गट – वैयक्तिक स्पर्धा
आरोही टकले हिने वैयक्तिक ऑल-अराउंड, हूप, क्लब्स आणि रिबन या चारही प्रकारांत सुवर्णपदके पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
रितिका इंगळेगावकर हिने बॉल प्रकारात सुवर्ण, ऑल-अराउंडमध्ये रौप्य आणि क्लब्समध्ये कांस्य पदक मिळवले.
शर्मिका जोशी हिने बॉल आणि रिबन या दोन प्रकारांत रौप्य पदके जिंकली.
या तिन्ही खेळाडूंनी महाराष्ट्राच्या कनिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक सुवर्णपदक जिंकण्यातही मोलाचे योगदान दिले.
कनिष्ठ गट – सांघिक स्पर्धा
आरोही टकले, हिरकणी धनवटपाटील, रेवा बेस, शुभ्रा देशपांडे आणि तिशा सरडा यांनी अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली.
या संघाने ऑल-अराउंड, पाच बॉल्स आणि पाच रिबन्स या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावली.
उपकनिष्ठ गट – वैयक्तिक स्पर्धा
मिराया परांजपे हिने क्लब्स प्रकारात सुवर्णपदक, तर वैयक्तिक ऑल-अराउंडमध्ये रौप्यपदक मिळवले.
अनन्या टंडाळे हिने रिबन प्रकारात सुवर्णपदक आणि क्लब्समध्ये रौप्यपदक पटकावले.
उपकनिष्ठ गट – सांघिक स्पर्धा
आस्था शिंदे, अन्वी अडसूळे, ऋद्धी गोखले, मुद्रा कोंडे, इरा पुरोहित आणि सोनिरा कोटकर यांनी ऑल-अराउंड आणि फ्रीहँड या प्रकारांत दोन सुवर्णपदके, तर हूप प्रकारात रौप्यपदक जिंकले.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक माधुरा तांबे आणि कल्याणी तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
पुण्याच्या या प्रतिभावान खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
रोवला गेला आहे!


