Tuesday, November 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय पारंपरिक ज्ञानशाखांना पुनर्जीवित करावे प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांचे प्रतिपादन...

भारतीय पारंपरिक ज्ञानशाखांना पुनर्जीवित करावे प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांचे प्रतिपादन : एमआयटी डब्ल्यूपीयूत ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन

 

 

पुणे, दि. २४ नोव्हेंबर : “भारतीय पारंपरिक ज्ञानशाखांना शिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे. याकडे ज्ञानाचा महत्त्वाचा स्रोत आणि संशोधक वृत्तीने पाहावे. या व्याख्यानमालेचा मुख्य धागा ही आपली शांततेची संस्कृती आहे.” असे विचार भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनाअंतर्गत दि. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित ३१ वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

या प्रसंगी पद्मश्री व्हेन. प्रा. गेशे नगवांग सामटेन, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि यूएसएच्या पर्ड्यू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मकरंद हस्तक हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

 

तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविराज एन. सिथाराम व डॉ. दत्ता दंडगे उपस्थित होते.

 

डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, “भारतीय शिक्षण पद्धती आजही कोलोनियल माइंडसेटमध्ये अडकलेली आहे. यात बदल घडणे आवश्यक असून खऱ्या अर्थाने माणूस घडविणारी शिक्षण पद्धती आवश्यक आहे. या शिक्षण प्रणालीला वारकरी संप्रदाय पुष्टी देतो. आजही महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रभाव असून यामुळेच समाजात सलोखा आहे. विश्वशांती हे मुख्य उद्दिष्ट घेऊन या व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ अविरत सुरू आहे.”

 

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविण्याच्या मुख्य उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वरसेवा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे, याची जाणीव यातून होते.”

 

डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, “शांततेसाठी विज्ञान, अध्यात्म, सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरण यांचे एकत्रीकरण महत्त्वाचे आहे. संत परंपरेतील मानवतेच्या विचारधारेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केले आहे. त्यांनी सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक सक्षमीकरणाने समाजात शांती निर्माण होऊ शकते, याचे बीज पेरले. समानता आणि मानवता हेच आपले मूळ तत्त्व आहे. पसायदानातील ज्ञानाचा प्रकाश जगभर व्हावा, हीच आपली संस्कृती आहे.”

 

पद्मश्री व्हेन. प्रा. गेशे नगवांग सामटेन म्हणाले, “विद्यापीठांमध्ये धर्म आणि विज्ञान यांची परिभाषा विद्यार्थ्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या माध्यमातून बाह्य जग कळते, परंतु अंतर्मनासाठी शांतीची गरज आहे. विज्ञानाच्या युगात अंतरिक तत्त्वज्ञान शोधणे गरजेचे आहे. अत्याधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये धर्मातील चांगल्या मूल्यांचा समावेश असेल, तर समाजव्यवस्था उत्तम बनेल.”

 

डॉ. राहुल वि. कराड म्हणाले, “वर्तमान काळात उच्च शिक्षणामध्ये परिवर्तन आणणे गरजेचे आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरची निर्मिती केली आहे. येथे मन आणि बुद्धीने विद्यार्थ्यांना सशक्त बनविले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सर्वांना शांतीची अत्यंत गरज आहे.”

 

डॉ. मकरंद हस्तक म्हणाले, “विश्वशांतीसाठी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. व्यवसाय, संशोधन आणि चांगला समाज बांधणीसाठी शिक्षण पद्धतीमध्ये अशा व्याख्यानमालेची गरज आहे.”

 

कुलगुरू डॉ. रविराज एन. सिथाराम यांनी स्वागतपर भाषण व प्रस्तावना मांडली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौतम बापट यांनी केले. प्रा. दत्ता दंडगे यांनी आभार मानले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments