Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedहवामान बदलाच्या संकटात शाश्वत शेती हाच भविष्याचा मार्ग* *भरडधान्यांचा प्रसार, पाण्याचे...

हवामान बदलाच्या संकटात शाश्वत शेती हाच भविष्याचा मार्ग* *भरडधान्यांचा प्रसार, पाण्याचे नियोजन आणि अन्नाची नासाडी रोखण्याची गरज; प्रा. शेखर मांडे यांचे मत*

 

पुणे : हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, वाढती लोकसंख्या, पोषणविषयक समस्या आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास ही भविष्यातील अन्नसुरक्षेसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब, हवामानास अनुकूल पिकांची लागवड, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि अन्नाची नासाडी रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच शासनाची सक्रिय धोरणे आणि समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे (INSA) अध्यक्ष तथा सीएसआयआरचे माजी महासंचालक प्रा. शेखर मांडे यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेचे स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे, सोसायटी फॉर प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी (SPBB) आणि नवी दिल्ली सोसायटी फॉर प्लांट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजीतर्फे पुण्यात यशदा येथे आयोजित ‘वनस्पती जनुक अभियांत्रिकी, चयापचयशास्त्र आणि शाश्वत अन्नव्यवस्था’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित डॉ. एन. बी. दास स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. ‘शेती, अन्न आणि पोषणातील शाश्वतता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

 

याप्रसंगी व्यासपीठावर, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस.,आयसीएआरचे राष्ट्रीय प्राध्यापक, बी. पी. पाल चेअर आणि एसपीबीबीचे अध्यक्ष प्रा. टी. आर. शर्मा, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय हरसुलकर, स्कूल ऑफ फूड टेक्नॉलॉजीच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली ए. भोईटे आणि सीएसआयआर-एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कडू हे उपस्थित होते.

 

अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन असूनही कुपोषणाची समस्या कायम असल्याकडे लक्ष वेधताना प्रा. मांडे यांनी भारतातील पोषणविषयक परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. देशात बालकांमधील खुंटलेली वाढ, महिलांमधील आणि बालकांमधील रक्तक्षय यांसारख्या समस्या कायम आहेत. त्याचवेळी लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या अतिपोषणाशी संबंधित आजारांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा म्हणजे केवळ पुरेसे अन्नधान्य उपलब्ध असणे नव्हे, तर प्रत्येकाला संतुलित आणि पौष्टिक आहार मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

अन्नपुरवठा साखळीतील अडचणी आणि अन्नाच्या नासाडीवरही त्यांनी विशेष प्रकाश टाकला. अन्न उत्पादनाच्या ठिकाणापासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कापावे लागणारे अंतर म्हणजे ‘फूड माइल्स’ ही संकल्पना स्पष्ट करताना, वाहतूक आणि साठवणुकीतील त्रुटींमुळे अन्नाची गुणवत्ता आणि पोषणमूल्ये कमी होण्याबरोबरच पर्यावरणावरील ताण आणि खर्चही वाढतो, असे त्यांनी सांगितले. भारतातील विखुरलेली कृषी व्यवस्था आणि अपुरी पुरवठा साखळी यांमुळे कृषी उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी पाण्याची उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे सांगताना त्यांनी प्राचीन अक्कड साम्राज्याच्या ऱ्हासाशी संबंधित दुष्काळाच्या ऐतिहासिक उदाहरणाचा संदर्भ दिला. पर्यावरणातील बदल आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम यांचा संबंध समजून घेणे आवश्यक असून, भविष्यात पाण्याची उपलब्धता आणि पाणीटंचाई यांचा पर्यावरणीय शाश्वतता व अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

 

समारोप करताना प्रा. मांडे यांनी हवामान बदलाचे परिणाम भारताच्या वर्तमानावरही जाणवत असून, शेती क्षेत्राने शाश्वत पद्धतींचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. अन्न आणि पोषणविषयक आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, जनजागृती, शासनाची दूरदृष्टी आणि समाजाचा सक्रिय सहभाग यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

चौकट

*भरडधान्ये भविष्यातील शाश्वत शेतीची गरज*

भरडधान्ये ही भविष्यातील शाश्वत शेतीची महत्त्वाची गरज असल्याचे सांगताना प्रा.मांडे यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या पिकांचे महत्त्व विशद केले. भरडधान्यांना तुलनेने कमी पाणी लागते, ती अधिक तापमान सहन करू शकतात आणि दुष्काळी परिस्थितीतही तग धरू शकतात. तसेच त्यामध्ये तंतुमय पदार्थ, लोह, जस्त आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा पिकांकडे वळणे आणि आहारात त्यांचा समावेश वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

——————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments