पुणे : दुबई येथे आयोजित दुबई बुडोकान कप -२०२६ या आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, वाघोली, पुणे येथील बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मयूर राहुल शिंदे याने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मयूरने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळातील कौशल्याची छाप उमटवली.
शारजाह स्पोर्ट्स क्लब, संयुक्त अरब अमिराती येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विविध देशांतील कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. मयूरने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. विशेषतः पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविल्यानंतर त्याची नेपाळच्या खेळाडूसोबत लढत झाली. या स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शिक्षणासोबतच कराटे खेळात सातत्यपूर्ण सराव, मेहनत, शिस्त आणि जिद्द याच्या जोरावर मयूरने हे यश संपादन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक श्याम नागरगोजे, प्रशिक्षक प्रसाद साबळे आणि आरती सरकार यांना दिले.
मयूरच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल, रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी तसेच कुलगुरू आर. डी. खराडकर, उप कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत रौप्यपदक मिळविणाऱ्या मयूर शिंदेच्या यशामुळे विद्यापीठासह पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


