Sunday, November 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सोमवारी विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा* ...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सोमवारी विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा* *पुणे विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा होणार गौरव; दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाच्या विकासावर विशेष परिसंवाद*

 

 

पुणे, दि.२९: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुणे विभागस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा उद्या, सोमवार (दि. ३० नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी १० वाजता बालेवाडी क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमात पुणे विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान टप्पा-२ (२०२६-२७) संदर्भात विभागस्तरीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाच्या विकासा’ या विषयावर विशेष परिसंवाद होणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

पुणे विभागातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुणे विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी (ता. पाटण) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सातारा जिल्ह्यातील कावडी (ता. जावळी) हिला द्वितीय, तर पुणे जिल्ह्यातील काळवाडी (ता. जुन्नर) हिला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये पुरंदर तालुक्यातील गुरोळी प्रथम, आंबेगाव तालुक्यातील रांजणी द्वितीय आणि आंबेगाव तालुक्यातील निधोटवाडी तृतीय क्रमांकाने सन्मानित होणार आहेत.

 

या कार्यक्रमाला पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित नसून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांना एकत्र आणणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे अनुभव इतर ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचविणे आणि दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक लोकसहभाग निर्माण करणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.

 

याशिवाय ग्रामपंचायतींनी केलेले सुशासन, जलसंधारण, शाश्वत विकास, पायाभूत सुविधा आणि लोकसहभाग या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य अधोरेखित करण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर राबविता येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या कामाचा गौरव होण्याबरोबरच आगामी टप्प्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजन, समन्वय, नियमित संनियंत्रण आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाला चालना मिळणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments