मंगळवार दि.१६ एप्रिल, २०२४
भारतात लोकसभा २०२४ यावर्षी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थक्रांती जीवन गौरव अभियानच्या वतीने खालील मुद्यावर आम्ही जनजागृती तसेच प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ दृष्टीक्षेप –
या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत एकूण मतदार ९६.८८ कोटी आहेत. याची सरासरी प्रती मतदार १७.८४ लाख आहे. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भारतीय जनता पक्षाचे एकूण ३०३ उमेदवार निवडून आले होते आणि त्यांना २२.९० कोटी मते मिळाली होती. एकूण मतदारांपैकी ज्येष्ठ नागरिक मतदान १७% म्हणजेच १६.४७ कोटी इतके आहे. त्यानुसार हे ज्येष्ठ नागरिकांचे मतदान कोणत्याही पक्षाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे ठरते, हे नाकारता येणार नाही.
अर्थक्रांती जीवन गौरव अभियानची भूमिका –
या निवडणुकीत आम्ही आमच्या विचाराचे ज्येष्ठ नागरिक उमेदवार महत्वाच्या मतदार संघात उभे करणार आहोत. अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाच्या प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या उमेदवारांचा निवडून येण्यासाठी प्रचार करणार आहोत. तसेच आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या भूमिकेच्या प्रस्तावाचा प्रसार करणार आहोत. आणि या निवडणुकीत सामील झालेल्या कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात अर्थक्रांती जीवन गौरव अभियानच्या विचार व प्रस्तावास सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत.
अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचा दृष्टीकोन आणि ज्येष्ठ नागरिक – राष्ट्रीय संपत्ती प्रस्ताव –
भारतातील कोणत्याही ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकास जात-धर्म-पंथ-महिला-पुरुष याचा भेदभाव न करता केंद्र सरकारने दरमहा ₹.१०,०००/- (महागाई भत्ता जोडून) मानधन / पेन्शनचा संवैधानिक अधिकार द्यावा. प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक सन्मानित होऊन, प्रतिष्ठित व सुसह्य जीवन उपभोगता यावे, यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय, कॅबिनेट मंत्री आणि अर्थसंकल्प सादर करताना स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. तसेच प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकास सामाजिक सेवा उदा. आरोग्य, संरक्षण, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था इ. आणि विशेष श्रेणीतील नागरी सुविधा सेवा उपलब्ध करुन द्याव्यात.
अर्थक्रांती जीवन गौरव अभियानने केलेले कार्य व पाठपुरावा –
अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाचा दृष्टीकोन आणि ज्येष्ठ नागरिक – राष्ट्रीय संपत्ती प्रस्तावासाठी भारताचे महामहिम मा. राष्ट्रपती, केंद्र सरकारचे विविध कॅबिनेट मंत्री, अनेक राज्य सरकारचे विविध मंत्री, विविध राज्यातील मा.राज्यपाल यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे आणि मा.पंतप्रधान कार्यालयात प्रस्ताव सादर केला आहे, यासाठी पाठपुराव्याने कार्यरत आहोत.
अर्थक्रांती एक विचार व कार्यशैली –
भारतात मा.डॉ.अनिल बोकील यांनी अर्थक्रांती प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने देशात ₹.१००/- च्या वरील सर्व नोटा बंद करण्यात याव्यात अशी मागणी केली. सर्व प्रकारचे कर रद्द करून एकच करप्रणाली २% संपूर्ण भारतात लागू करण्यात यावी. या करातून केंद्र सरकार, राज्य सरकार, बँका व स्थानिक स्वराज्य संस्थाना उत्पन्न मिळेल, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.


