पुणे : आर्ट मॅजिक संस्थेतर्फे ‘आर्ट मॅजिक २०२४’ या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २४ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आर्ट मॅजिक संस्थेच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार यांनी दिली.
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत कुमावत व चित्रकार मुकीम तांबोळी उपस्थित राहणार आहेत. महालक्ष्मी पवार आणि अंबादास पवार यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले असून अनुजा जोशी, ऋचा पोतदार, निरज शहा, इशिता शहा, आदिती काशीद, सान्वी खळदकर, श्लोका धुमाळ यांनी प्रदर्शनाचे संयोजन केले आहे.
प्रदर्शनाचे यंदाचे १७ वे वर्ष असून आर्ट मॅजिक संस्थेला देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच यावर्षी संस्थेच्या संस्थापिका महालक्ष्मी पवार यांना दुसऱ्यांदा इमिनंट आर्टिस्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रदर्शनात लहान मुलांपासून मोठ्यांनी काढलेली विविध चित्रे पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्याने ऍक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कलर पेन्सिल, ट्राय पेस्टल तसेच रेझीन आर्ट, चारकोल, परस्पेक्टिव्ह या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रांचा समावेश प्रदर्शनात असणार आहे. चित्र प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले असून पुणेकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


