पुणे – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक मोठे नेते नव्हते, तर आपल्या ध्येय धोरणांनी देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देणारे राष्ट्रपुरुष होते. आज देशाची जी सर्व क्षेत्रांमध्ये विलक्षण घोडदौड सुरू आहे, त्याचा पाया अटल बिहारी वाजपेयी यांनी घातला. अटल बिहारी वाजपेयी यांचे देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
लोकतंत्र सेनानी संघ पुणे तर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली पर कार्यक्रमाचे कलाप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार प्रदीप रावत हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी संस्थेचे प्रमुख विलास पाठक, सुधीर बोडस, अनुपमा लिमये, मुरलीधर घळसासी, अनिता बिरजे आदी यावेळी उपस्थित होते.
सुनील देवधर म्हणाले, देश स्वतंत्र करण्यासाठी कारागृहामध्ये गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच देशांमध्ये लोकशाही टिकावी, यासाठी आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेले सैनिकही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही टिकून आहे. अशा लोकशाही सैनिकांचे स्मरण राहावे आणि त्यांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदीप रावत म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन एक आदर्श आहे. त्यांचे जीवन आणि विचार आजच्या तरुणांपर्यंत विविध मार्गाने पोहोचले पाहिजे. मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे गैरमार्गाला लागलेले तरुण अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार आणि जीवन विविध मार्गाने तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
महासचिव मुरलीधर घळसासी यांनी प्रदीप रावत व सुनिल देवधर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा, त्यांनी समाजसाठी व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर परिचय करून दिला.
सुधीर बोडस म्हणाले, आणिबाणीच्या काळामध्ये जेव्हा देशांमध्ये लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकशाहीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अनेक लोकशाही सैनिकांचे कार्य आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्या सैनिकांचे सध्या काय प्रश्न आहेत? हे सुद्धा जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकतंत्र सेनानी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या, माजी नजरसेविका अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अनिता बिरजे यांनी आभार मानले.